पुणे | 30 सप्टेंबर 2023 : राज्यात यंदा मान्सून उशिराने दाखल झाला. आज पावसाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्टेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे. या महिन्यात राज्यात सर्वच भागांत चांगला पाऊस झाला. यामुळे राज्यातील धरणांमध्ये जलसाठा वाढला. अनेक शहरांचा पाणी प्रश्न मिटला तसेच रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. शनिवारी पुणे हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे हा पाऊस पडणार आहे.
अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गोव्यापासून कोकण किनारपट्टीपर्यंत हवामान विभागाने आँरेज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांच्या अनेक बोटी बंदरातच असल्याने त्यांच्यापुढे संकट निर्माण झाले आहे. येत्या २४ तासांत चक्रीवादळाची परिस्थिती वाढणार आहे. बदललेल्या परिस्थितीमुळे सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने सरासरी गाठली आहे.
30 Sept, Well marked low pressure area over Arabian sea off S Konkan-Goa coasts & is likly to concentrate in Depression over same region in next 24hrs
Well Marked Low Pressure Area over NW Bay of Bengal & is likly to move NW towards N Odisha & adj West Bengal coasts in next 24hrs pic.twitter.com/XNrpyWhNMq— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 30, 2023
हवामान विभागाने कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट दिल्यानंतर राज्यातील इतर भागांत मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात कुठेही अलर्ट दिला नाही. राज्यातील उर्वरित भागांत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. दोन दिवस कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या सर्वच भागांत पावसाचा अलर्ट दिला आहे.
नाशिक जिल्ह्यातील मुकणे धरण शिवारात शुक्रवारी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यावेळी सांजेगाव ते कावनई या दोन गावांमध्ये ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी चक्रीवादळासारखी वावटळ धरणात फिरताना दिसत होती. त्यावेळी धरणाचे पाणी आकाशात उडत होते. स्थानिक गावकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये ही दृश्य कैद केली आहेत. तसेच सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांचा जलसाठाही वाढला आहे.