रणजित जाधव, पुणे | 17 जुलै 2023 : आषाढ महिन्याचा शेवटचा रविवारी काल होता. त्यानंतर श्रावण महिना सुरु आहे. यंदा आधिक महिना आलाय. श्रावण अन आधिक महिन्याला धार्मिकदृष्ट्या महत्व असते. यामुळे या महिन्यांमध्ये अनेक जणांकडून मांसाहारी पदार्थ सेवन केले जात नाही. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी १६ जुलै रोजी गटारी अमावस्या होती. त्यासाठी मांसाहारी पदार्थ खाण्यासाठी खवय्यांनी गर्दी केली होती. मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी पुणे शहरातील बाजारात खवय्यांची गर्दी झाली होती. पुणेकरांनी रविवारी हजारो किलो मटण, चिकन फस्त केले.
पुणेकरांनी ४५ टन मासळी, 2 हजार बोकडांचे मटण रविवारी फस्त केले. आषाड महिन्यातील शेवटचा रविवार असल्याने नागरिकांनी सकाळपासूनच मटण, मासळीच्या दुकानासमोर मोठ्या रांगा लावल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत या दुकानांवर गर्दी होती. गटारी अन् आलेला रविवार यामुळे लोणावळासह अनेक पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल होते. गटारी आणि वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले. कोसळणारे धबधबे आणि कधी रिमझिम तर कधी धो धो कोसळणाऱ्या पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक लोणावळ्यात आले होते. वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी झाली होती.
चिकन, मटणाची मागणी वाढल्यामुळे दरवाढ झाली होती. बकऱ्याचे मटण किलोमागे शंभर रुपयांनी वाढले होते. मासळी, चिकन यांच्या दरातही वाढ झाली होती. पुणे, मुंबईत चांगलीच मागणी होती. दर वाढ झाल्यानंतरही ग्राहकांकडून चिकन, मटण अन् मासळी यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली. अनेकांनी हॉटेलमध्ये जाऊन मांसाहारी पदार्थांवर ताव मारला. अनेकांनी ऑनलाइन बुकींग करुन घरीच मांसाहारी पदार्थ मागवून घेतले. त्यामुळे फूड डिलेव्हरीची उलाढाल वाढली होती.
यंदा आधिक महिना आलेला आहे. यामुळे आषाढ महिन्यानंतर आधिक, त्यानंतर श्रावण मग नवरात्रोत्सव येणार आहे. यामुळे अनेक जण आता सुमारे अडीच महिने मांसाहारी पदार्थांचे सेवन बंद करतील. मांसाहारी खवय्यांना आता शाकाहारी भोजनाचा आस्वाद घ्यावा लागणार आहे.