प्रदीप कापसे, पुणे | 23 जुलै 2023 : पुणे तेथे काय उणे असे नेहमी म्हटले जाते. मग पुणे शहरातील चोर गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असताना, यापासून पोलिस मुख्यालयही वाचलेले नाही. चोरट्यांनी थेट पोलीस मुख्यालयाकडेच वक्रदृष्टी वळवली आहे. चोरट्यांनी पुणे पोलीस ग्रामीण मुख्यालायत चोरी केली आहे. यामुळे पुण्यात पोलीस ठाणीच चोरट्यांपासून सुरक्षित नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांच्या ग्रामीण मुख्यालयाच्या आवारात चोरी करण्याचा प्रकार घडला आहे. पोलीस मुख्यालयातून 80 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांनी ज्या ठिकाणी सतत पोलीस असतात त्या ठिकाणी चोरीचे धाडस केले आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनच्या आवारातच चोरी झाल्याने चर्चा सुरु झाली आहे.
गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांची सर्वात महत्वाची भूमिका असते. त्यासाठी पोलिस रोज रात्री शहरात नियमित पेट्रोलिंग करत असतात. पोलिसांची पेट्रोलिंग सुरु असताना अनेक चोर पकडले गेले आहेत. काही वेळा चोरी, दरोडेही रोखले गेले आहेत. परंतु ज्या ठिकाणी पोलिसांचा २४ तास बंदोबस्त असतो, पोलिसांची मोठा ताफा असतो, त्या ग्रामीण पोलीस मुख्यालयात चोरी झाली आहे. यामुळे पुणे शहरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. आता पोलीस मुख्यालयातील चोरीचे आरोपी शोधण्याचे काम करण्याची जबाबदारी चतु:शृंगी पोलीस ठाण्यावर आली आहे. पोलीस ठाण्यात चोरी करणारे हे चोरी किती दिवसांत सापडतात? हे आता पाहावे लागणार आहे.