पुणे | 8 ऑक्टोंबर 2023 : छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्लावर नेहमी पर्यटकांची वर्दळ असते. पुणे शहरापासून 48 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला भोर गावाच्या जवळ आहे. वेल्हे तालुक्यात असलेला हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 1394 मीटर उंचीवर आहे. या किल्लावर नेहमी पर्यटकांची वर्दळ असते. किल्ल्यास ऐतिहासिक महत्व असल्यामुळे शिवप्रेमींची वर्दळ असते. रविवार सुटीचा दिवस साधून राजगडावर पर्यटक आले होते. यावेळी मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला.
किल्ले राजगडावर रविवार असल्यामुळे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची चांगलीच वर्दळ होती. त्याचवेळी सकाळी अचानक पर्यटकांवर मधमाशांकडून हल्ला झाला. काही कळण्याच्या आताच मधमाशांनी अनेकांना चावा घेतला. या घटनेत 15 ते 20 जण जखमी झाले. मधमाशांच्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या पर्यटकांपैकी काही जण बेशुद्ध पडले. त्यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. या चार जणांसह इतर तेरा पर्यटक किरकोळ जखमी झाले आहे, अशी माहिती पुरातत्त्व विभागाची कर्मचारी बापू साबळे यांनी दिली आहे.
पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्यावर हल्ल्याची ही घटना सुवेळा माची परिसरात घडली. या हल्ल्याची माहिती स्थानिक यंत्रणेस मिळाली. त्यानंतर वेल्हा पोलीस आणि स्थानिक यंत्रणेकडून पर्यटकांना गडावरून खाली आणण्यात आले. पर्यटकांनी लावलेल्या सुगंधी द्रव्यांमुळे मधमाशांनी हल्ला केल्याची शक्यता स्थानिक लोकांनी व्यक्त केली. पर्यटकांमध्ये डोंबिवली, मुंबई तसेच पुणे येथील सोळा जणांचा ग्रुपचा समावेश होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली राजधानी राजगड होती. या किल्ल्यावर शिवाजी महाराज यांचे पुत्र राजाराम यांचा जन्म झाला. तसेच महाराजांच्या पत्नी सईबाई यांचा मृत्यू या ठिकाणी झाला. महाराज आग्रा येथून आल्यानंतर याच ठिकाणी पोहचले. या किल्ल्याच्या महादरवाजाच्या भिंतीत अफझलखानाचे शीर दफन केले आहे. अनेक घटनांचा हा किल्ला साक्षीदार असल्यामुळे पर्यटक येथे नेहमी येत असतात.