पुणे : राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा सर्वात पहिला रुग्ण पुण्यातच आढळला. संबंधित रुग्ण विदेशातून मुंबई विमानतळावर आल्याने मुंबईत देखील कोरोनाचा शिरकाव झाला. राज्याची राजधानी मुंबई कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरली. त्यापाठोपाट पुण्याला कोरोनाचा मोठा फटका बसला. या संकटात अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आली होती. मात्र, लोकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोना पुन्हा डोकंवर काढू लागला. त्याचा परिणाम म्हणजे पुण्यात मंगलवारी तब्बल 661 नवे रुग्ण आढळले. पुण्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा बघता प्रशासन कितपत सज्ज आहे, याची माहिती जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमके किती बेड्स सध्या उपलब्ध आहेत, याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या बातचित करुन मिळवली (Pune Corona Update).
पुण्यात सध्या किती बेड्स उपलब्ध?
“पुणे शहरात सध्या कोरोना रुग्णांसाठी एकूण बेड्सची संख्या 4457 इतकी आहे. यामध्ये आयसीयू बेड्सची संख्या 233 आहेत. यापैकी सध्या 155 आयसीयू बेड्स रिकामे आहेत. पुण्यात व्हेंटिलेटर बेड्सची संख्या ही 383 इतकी आहे. यापैकी 211 व्हेंटिलेचर बेड्स रिकामे आहेत. ऑक्सिजन बेड्सची संख्या ही 2384 इतकी आहे. यापैकी 1532 ऑक्सिजन बेड्स हे रिकामे आहेत. तर आयसोलेशन बेड्सची संख्या 2896 इतकी आहे. त्यापैकी 1212 आयसोलोशन बेड्स रिकामे आहेत”, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.
“पुण्यात सध्या 2896 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. यापैकी 164 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. पुण्यात आतापर्यंत 1 लाख 97 हजार 964 रुग्णांची नोंद झालीय. यापैकी 1 लाख 90 हजार 242 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. रुग्णांची सध्याची संख्या पाहता पुण्यात उपचारांसाठी पुरेसे बेड्स उपलब्ध आहेत”, अशी माहिती देखील महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे (Pune Corona Update).
1) खासगी रुग्णालयातील 50 टक्के बेड राखीव
पुणे महापालिकेनं खासगी रुग्णालयांना बेडसंदर्भात सूचना देताना शहरातील 50 टक्के बेड राखीव ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. खाजगी रुग्णालय प्रमुखांशी झालेल्या बैठकीत पालिका आयुक्तांनी शहारातील रुग्णालयांना अश्या प्रकारच्या सूचना दिल्या आहेत.
खासगी रुग्णालयातील बेडची माहिती डँशबोर्डवर अपडेट करणं बंधनकारक करण्यात आली आहे. तसंच कोरोना रुग्णाला खाजगी रूग्णालयानं प्रवेश नाकारल्यास महापालिका करणार कारवाई आहे. त्यामुळे कोणत्याही कोरोना रुग्णाला नाकारण्याचं धाडस खासगी रुग्णालयांनी करु नये, अशी तंबीच पालिका आयुक्तांनी दिली आहे.
दुसरीकडे खाजगी रुग्णालयातील बेड ताब्यात घ्यायला महापालिकेने सुरुवात केली आहे. वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे पुणे महापालिकेने अलर्ट होत एक पाऊल पुढे टाकलं आहे.
2) तीन ठिकाणी कोव्हिड सेंटर
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. काल तर एकाच दिवशी जवळपास कोरोनाचे सातशे रुग्ण आढळून आले. यानंतर महापालिका अगदी अलर्ट झाली आहे. रक्षक नगर, गणेश कला क्रीडा मंडळ, पठारे स्टेडियम या तीन ठिकाणी महापालिका कोव्हिड सेंटर सुरू करणार आहे.
रक्षक नगर, गणेश कला क्रीडा मंडळ, पठारे स्टेडियम या तिन्ही सेंटरवर 500 बेड्स उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रुग्णांना बेड्स मिळणं सुलभ होणार आहे. येत्या दोन दिवसांत हे सेंटर पुन्हा सुरु करणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांनी दिली आहे.
3) गरज पडल्यास पुन्हा जंबो कोव्हिड सेंटर सुरु करणार
तसंच गरज पडल्यास पुन्हा जम्बो कोविड सेंटरही सुरू करणार असल्याची माहिती अधिकारी डॉ. आशिष भारती यांनी दिली आहे. एकंदरितच कोरोनाला आळा प्रतिबंध घालण्यासाठी पुणे महापालिका अॅक्शन मोडमध्ये आहे
संबंधित बातमी : Panjabi Singer : प्रसिद्ध गायक सरदूल सिकंदर यांचं कोरोनामुळे निधन, संपूर्ण कला विश्वात शोक