अभिजित पोते, पुणे : राज्यात जून महिना पावसाची वाट पाहण्यात गेला. त्यानंतर २५ जून रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर पाऊस सुरु झाला आहे. पुणे हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी काही ठिकाणी यलो अन् काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ३ अन् ४ जुलै रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात चांगला पाऊस होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. देशात जुलै महिन्यात सरासरीच्या 94 ते 106 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
पुणे शहरासह उपनगरांमध्ये गेला आठवड्याभर पाऊस सुरु आहे. पुढील दोन ते तीन दिवस शहरात ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. जून महिन्यात पुणे शहरात 104 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण साखळी क्षेत्रात देखील पावसाची संततधार सुरु आहे. गेल्या आठ दिवसात धरण क्षेत्रात 1 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात आता 18 टक्के जलसाठा आहे. चारही धरणात मिळून 5.23 टीएमसी पाणीसाठा आहे.
वसई विरार नालासोपारा परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. शनिवारी रात्रभर रिमझिम पावसासह अधून मधून जोरदार पाऊस पडला. पावसाची संततधार सुरू असतानाही शहरातील मुख्य रस्त्यावर कुठेही पाणी साचलेले नाही. रविवारी सकाळी विरार चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल ही सुरळीत सुरू आहेत.
मुंबई, ठाणे परिसरात पाऊस सुरु आहे. हा आठवडाही पावसाचा असणार आहे. तसेच 5 जुलैनंतर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण होत असल्यामुळे पावसाचा जोर कायम राहणार आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरु झाला आहे. यामुळे शेतीकामांना वेग आला आहे. ज्या ठिकाणी जमिनीत पुरेशी ओल झाली आहे, त्याठिकाणी पेरणी करण्यात येत आहे. यंदा पाऊस उशिरा आल्यामुळे पेरण्याही खोळंबल्या होत्या.
नाशिक जिल्ह्यांतील त्र्यंबकेश्वरला 24 तासांत 65 मिमी पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणी तुंबले आहे. मेनरोड वरील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. तसेच पाणी तुंबल्याने रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य झाले आहे.