नगर : बारावीच्या गणिताच्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नगरपर्यंत येऊन पोहोचले होते. याप्रकरणी आणखीन एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. यापूर्वी पाच जणांना नगरमधून अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेला व्यक्ती शाळेचा संचालक आहे. यामुळे बारावीचा पेपर फूट प्रकरण आणि नगर हे समीकरण सुरु झाले की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बारावीचा हा पेपर फुटला असला तरी ही परीक्षा परत न घेण्याचा निर्णय शालांत परीक्षा मंडळाने घेतला आहे.
बारावीचा गणिताचा पेपर विद्यार्थ्यांना एक तास आधीच मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बारावीचा गणिताचा पेपर फुटल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस पथकाकडे देण्यात आला. या प्रकरणी आता अक्षय भामरे याला मुंबईमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे.
कोण आहे भामरे
अक्षय भामरे मातोश्री भागूबाई भामरे कृषी आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे संचालक आहेत. प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर आल्यानंतर त्याचे फोटो काढून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवत प्रत्येकी 10 हजार रुपये त्याने घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी या आधी एका मुख्याध्यापकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे
यापूर्वी कोणाला झाली अटक
किरण संदीप दिघे, अर्चना बाळासाहेब भामरे, भाऊसाहेब लोभाजी अमृते, वैभव संजय तरटे, सचिन दत्तात्रय महारनवर या आरोपींना यापूर्वीच अटक झाली आहे. दादर येथील अँटॉनिओ डिसिल्वा हायस्कूलमधील शिक्षिकेच्या तक्रारीवरून याप्रकरणी मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
दादर ते नगर कनेक्शन
गुन्हे शाखेच्या तपासात दादरमधील विद्यार्थ्यांला नगरमधील आरोपींकडून प्रश्नपत्रिका मिळाल्याचे समोर आले होते. यापूर्वी या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी 5 मार्चला अहमदनगर येथून एका संशयीताला ताब्यात घेतले होते.