पुणे : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सशर्त परवानगी दिल्यानंतर पुण्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यात बैलगाडा शर्यतीचं (Bullock Cart Race) आयोजन करण्यात आलं होतं. मात्र आज होणाऱ्या या स्पर्धांना पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी काल नाकारली. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे प्रशासनानं हा निर्णय घेतला, मात्र तरीही पुण्यातल्या खेडमध्ये गनिमी काव्याने बेकायदेशीररित्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
शर्यतीत शंभरपेक्षा जास्त बैलगाडा सहभागी
या गनिमी काव्याने भरवलेल्या बेकायदा बैलगाडा शर्यतीत शंभरपेक्षा अधिक बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवल्याचे दिसून आले. बैलगाडा शौकीन आणि मालकांनी खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा या ठिकाणी या शर्यती छुप्या पद्धतीने भरवल्या होत्या. प्रशासनाने बैलगाडा शर्यत ऐनवेळी स्थगित केल्याने शर्यत आयोजक आणि बैलगाडा मालक आक्रमक झाल्याचे दिसून आले. याकडे पोलिसांचे मात्र पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले.
शर्यत आयोजक आणि मालकांवर कारवाई होणार?
प्रशासनाने परवागी नाकरल्यानंतरही या शर्यती भरवल्या गेल्या असल्याने बैलगाडा मालक आणि आयोजकांवर पोलीस कारवाई होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्येही नियम मोडत बैलगाडा शर्यती भरवण्यात आल्या होत्या, त्यावेळी आयोजकांसह काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. राज्यासह मुंबई, पुणे, नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात आज 8 हजारापेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर एकट्या मुंबईत साडे पाच हजाराच्या आसपास कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर पुणे शहरात 412 नवे रुग्ण सापडले आहेत. पुण्यात सध्या 1 हजार 799 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी बैलगाडा शर्यत तात्पुरती स्थगित करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला होता, मात्र प्रशासनाचा हा निर्णय बैलगाडा मालकांकडून फेल ठरवण्यात आला आहे. त्यामुळे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.