पिंपरी चिंचवड : स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा (Prostitute) पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली आहे. यावेळी वेश्याव्यवसाय करणाऱ्या 5 महिलांची सुटकाही करण्यात आली. पिंपळे सौदागरमध्ये जगताप डेअरीजवळ कॅसल स्पा (Castle Spa) इथे आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यावसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याठिकाणी एक डमी ग्राहक पाठवून खरेच वेश्याव्यवसाय केला जातो का, हे पडताळून पाहण्यात आले. सापळा लावून वेश्याव्यवसायाचा गोरखधंदा पोलिसांनी उजेडात आणला आहे. या वेश्याव्यवसायाचा जाळ्यातून पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर सीमा धोत्रे आणि रमेश साहिराम याच्या विरोधात भादंवि आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मुलींकडून अवैधरित्या वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. दि. 6 सप्टेंबर रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी यांना वाकड पोलीस स्टेशन हद्दीत शॉप नं. 17/5/1, साई नगर प्लाझा, साई चौक, जगताप डेअरा, पिंपळे सौदागर येथील Castle नावाचे स्पा सेंटर मुलींना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करून घेत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून, सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
यावेळी आरोपींकडून 5 हजार रुपये रोख, 140 रुपयांचे इतर साहित्य तसेच 8 हजार रुपये किंमतीचा एक मोबाइल असा एकूण 13,140 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी सीमा दीपक धोत्रे (वय 37, रा. शिवप्रतिष्ठान गल्ली नं. 1, फेमस चौक, नवी सांगवी) आणि स्पाचा चालक-मालक रमेश कुमार साहिराम (वय 24, सध्या रा. स्पा, मूळ रा. वॉर्ड नं. 5, गाव 3, एमके, जि. गंगानगर, राजस्थान) यांना अटक करण्यात आली आहे.
अटक आरोपींवर वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुरनं 740/2022 भादंवि कलम 370 (3), 34सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा 1956चे कलम 3,4,5,7प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.