Rain : राज्यात पुढील पाच दिवस राहणार मुसळधार पाऊस, काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

| Updated on: Jul 20, 2023 | 10:54 AM

Rain News : राज्यात गेल्या दोन, तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. अजून पुढील चार, पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Rain : राज्यात पुढील पाच दिवस राहणार मुसळधार पाऊस, काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट
Follow us on

पुणे | 20 जुलै 2023 : राज्यातील सर्वच भागांत पाऊस सुरु झाला आहे. काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहे. राज्यातील काही ठिकाणी २४ तासांत २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासांत अनेक ठिकाणी पावसाने १०० मिमी जास्त बरसला आहे. लोणावळ्यात सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. आगामी चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाचा काय अंदाज

राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाने कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे स्थानिक प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई, ठाणे, रायगडमध्ये मेघगर्जनेसह पाऊस असणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याकडून वर्तवला आहे.

पुण्यात दोन दिवस सुट्टी

घाट भागात झालेल्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी आणि शुक्रवारी दुर्गम भागात असलेल्या शाळा आणि अंगणवाड्या बंद ठेवल्या जाणार आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहे. ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आणि सीडीपीओ यांनी परिसरात असणे आणि सर्व विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापक शाळेत उपस्थित राहतील, असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

कोयना धरण परिसरात जोर

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरणात 74 हजार 569 क्यूसेक पाण्याची आवक सुरु आहे. धरणाचा पाणीसाठा 37.36 टक्के झाला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. कोयना नगर 253 मिमी, नवजा 272 मिमी तर महाबळेश्वर 331 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

लोणावळ्यात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. तीन दिवसांत 700 पेक्षा जास्त मिलीमीटर पाऊस लोणावळ्यात झाला आहे.