फळ विक्रेत्याला मराठीत बोलायला सांगितलं म्हणून जमावाने मराठी तरुणाला कान पकडून माफी मागायला लावली. मुंब्र्यातील ही घटना ताजी असतानाच आता ठाण्यानंतर पुण्यात मराठी-हिंदी वाद पेटला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मराठी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या एअरटेलच्या टीम लीडरला चोप दिला आहे. पुणे वाकडेवाडी येथे एअरटेलच शो रुम आहे. तिथली ही घटना आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाहबाज अहमद नावाच्या टिम लीडरला बेदम चोप दिला. एअरटेलच्या कर्मचारी वर्गाला फ्लोअर वर हिंदीच बोलायचं, मराठीत बोलले तर कामावरून काढून टाकेन अशी धमकी या शाहबाज अहमदने दिली होती.
हिंदू सणांना सुट्टी न देणं तसच मागच्या तीन महिन्यांपासून मराठी मुलांचा पगारही केला नव्हता. त्यावर येथील कर्मचाऱ्यांनी आमचा पगार थांबवला म्हणून मनसेकडे तक्रार केली होती. “कोनसी भी सेना लेके आओ नही बोलता मराठी आणि कामावरून काढून टाकतो बघू कोण येतंय?” अशी धमकी या शाहबाज अहमदने एअरटेल शो रुममध्ये काम करणाऱ्या मराठी मुलांना दिली होती.
तीन ऑफिसेस फोडण्याचा इशारा
या मराठी मुलांच्या अन्यायाला मनसे स्टाईलने वाचा फोडली. येत्या सोमवारपर्यंत पगार करा, अन्यथा एकाच वेळी एकाच दिवशी स्वारगेट, वाकडेवाडी, खराडी येथील तीन एअरटेल ऑफिस फोडून टाकणार असा अंतिम इशारा मनसे राज्य सचिव आशिष साबळे पाटील यांनी दिला आहे.
मुंब्र्यात काय घडलं?
मुंब्र्यात राहणारा विशाल गवळी हा मुलगा बहिणीसाठी औषध घ्यायला बाहेर गेला होता. तिथून तो फळ घ्यायला गेला. फळ विक्रेत्याने 100 रुपये किलो भाव सांगितला. त्यावर त्याने 50 रुपयाला देणार का? म्हणून विचारणा केली. फळ विक्रेता हिंदीत बोलत होता, हा मुलगा त्याला बोलला, मराठीत बोल महाराष्ट्रात राहतो. त्यातून वाद सुरु झाला. पोलिसांनी उलट विशाल गवळीवर गुन्हा दाखल केला. “त्या मुलाला आणि त्याच्या आईला चार-चार तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं” असा आरोप ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला. आता पुण्यातही मराठी बोलण्यावरुन अशाच प्रकारची घटना घडली आहे.