पुणे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आतापर्यंत वर्चस्ववादातून टोळीयुद्धाच्या अनेक घटना पुण्यात घडल्या आहेत. पण आता पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आणखी एक भयानक प्रकार समोर आला आहे. इंदापूरमध्ये तहसील कार्यालयाच्या जवळ भर चौकात तहसीलदारावर अज्ञात आरोपींनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे भर दिवसा सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास संबंधित घटना घडली. या घटनेनंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तहसीलदार पदावरील अधिकाऱ्यावर भर दिवसा जीवघेणा हल्ला होत असेल तर आरोपींना पोलिसांचं भय नाही का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. आरोपींना नेमका कुणचा वरदहस्त आहे? असा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे. या घटनेनंतर इंदापूरच्या तहसीलदारांनी प्रतिक्रिया दिली आहे. तहसीदरांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा थरार सांगितला आहे.
इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी आज सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास इंदापूर शहरातील संविधाना चौकात हल्ला केला. चौकात तहसीलदारांची गाडी आली असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर लोखंडी रोडने जोरदार हल्ला चढविला. यानंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची गंभीर दखल राजकीय नेत्यांनीदेखील घेतलीय. या घटनेनंतर स्वत: इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
“मी नेहमीप्रमाणे इंदापूर प्रशासकीय भवनाकडे निघालो होतो. माझी गाडी संविधान चौकात आली तेव्हा चारचाकी गाडीतून एक हल्लेखोर उतरला आणि लोखंडी रॉडने त्याने थेट माझ्यावर हल्ला चढवला. आमच्या अंगावर मिरचीची पूड उधळली. त्यावेळी माझ्या गाडीत माझा चालक आणि मी होतो. आम्ही आमचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आणखी दोन ते तीन हल्लेखोर गाडीतून उतरून आले. त्यांनी देखील आमच्यावरती हल्ला चढवला आणि ते फरार झाले”, असा थरार श्रीकांत पाटील यांनी सांगितला.
श्रीकांत पाटील यांनी आता आपण कायदेशीर मार्गाने अज्ञात आरोपींच्या विरोधात लढा देणार असल्याचं सांगितलं आहे. या घटनेप्रकरणी आपण पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती श्रीकांत पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, या घटनेवरुन आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटेनवरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी फडणवीसांकडे थेट राजीनाम्याची मागणी केली आहे. “देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही म्हणाला होतात की, गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील. गृहमंत्री महोदय… गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जातायेत. रस्त्याने चालणारा सामान्य माणूस सुरक्षित नाही. भर दिवसा इंदापूर तहसीलदारावर हल्ला झाल्याने अधिकारीही सुरक्षित नाही. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांचा पत्ता नाही! कुठंय तुमचं कायद्याचं राज्य? आपण नेहमी नैतिकतेचे कांदे सोलता. आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.