पुणे | 21 ऑक्टोंबर 2023 : पुणे येथील गहुंजे स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारताने सात विकेटने विजय मिळवला. विराट कोहली याने शतकी खेळी केल्यामुळे क्रिकेटप्रेमी जाम खुश झाले. कोहलीने शानदार फलंदाजी केली. त्याने 26 हजार धावांचा टप्पा या सामन्यात पूर्ण केला आहे. ही कामगिरी करणारा जगातील चौथा फलंदाज विराट कोहली ठरला. विराटच्या खेळीमुळे पुणे गहुंजे स्टेडियमवर चैत्यन्य निर्माण झाले होते. त्यावेळी गहुंजे येथील शेतकरी खुश होते. परंतु ग्रामस्थ नाराज झाले. शेतकरी खुश आणि ग्रामस्थ नाराज होण्याचे कारण वेगळेच आहे.
सामन्यामुळे गावातील शेतकऱ्यांची चांगलीच कमाई झाली. यामुळे शेतकरी खुश झाले. एमसीएने गुरुवारी झालेल्या सामन्यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी 42 एकर जमीन भाडेतत्वावर घेतली होती. शेतकऱ्यांना पुणे येथील गहुंजे स्टेडियमवर होणाऱ्या पाच सामन्यांसाठी चांगला मोबदला एमसीएने दिला आहे. एक एकर जमीनसाठी एक लाख रुपये शेतकऱ्यांना दिले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन स्टेडियमजवळ आहे, त्यांना जास्त भाडे दिले जाणार आहे. स्टेडियमपासून लांब असणाऱ्या जमिनीसाठी कमी भाडे असणार आहे.
गहुंजे येथे झालेल्या सामन्याची तिकीटे गावकऱ्यांना मिळाली नाही. यामुळे गावकरी नाराज झाले आहेत. गावकरी म्हणतात, आमच्या गावात सामना आहे आणि आम्हालाच तिकीट मिळत नाही. तसेच स्टेडियमवर तिकीट काउंटर नाही. गावकरी या सामन्याचे तिकीट घेण्यासाठी अनेकवेळा स्टेडियमवर जाऊन आले. परंतु त्यांची निराशच झाली. सामन्याच्या एका दिवस आधी अनेक युवक तिकीट घेण्याच्या अपेक्षेने स्टेडियमवर गेले. परंतु त्यांची निराशाच झाली.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी जेव्हा सामने झाली तेव्हा गावकऱ्यांसाठी ग्रामपंचयतीला 100 तिकीट दिले जात होते. परंतु आता ग्रामपंचायतीस तिकीट दिले नाही. गावकऱ्यांच्या अनेक मित्र आणि नातेवाईकांनी तिकीटांची त्यांच्याकडे मागणी केली. परंतु गावकरी त्यांना तिकीट मिळवून देऊ शकले नाही. त्यामुळे गावकरी नाराज झाले.