पुणे | 7 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरातून इंटरसिटी एक्स्प्रेस सुरु होत आहे. पुणे-हरंगुळ ही नवीन इंटरसिटी रेल्वे येत्या मंगळवारपासून (१० ऑक्टोंबर) सुरु होणार आहे. लातूर-पुणे दरम्यान इंटरसिटी चालवावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. लातूर जवळच्या हरंगुळस्टेशनपर्यंत ही रेल्वेगाडी आता रोज धावणार आहे. सकाळी ६.३० वाजता ही रेल्वे पुणे येथून सुटणार आहे. ही गाडी दररोज धावणार असल्याने प्रवाश्यांची चांगली सोय होणार आहे. तसेच लातूर- मुंबई रेल्वेचा भार कमी होणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरात गेल्या तीन दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. 5 ऑक्टोबर रोजी महापालिका प्रशासनाने संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा कामासाठी बंद ठेवला होता. त्यानंतर 6 ऑक्टोबरला पाणी पुरवठा विस्कळीत राहणार होता. यामुळे सात ऑक्टोबरला पाणी पुरवठा सुरळीत होणे गरजेचे होते. मात्र सलग तिसऱ्या दिवशी शहरात पाणी पुरवठा बंद आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रशासकीय राज असल्याने अधिकारी वर्ग कुठल्याही तक्रारीकडे लक्ष देत नाहीत.
मेट्रो आणि उड्डाण पुलाच्या कामामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक आणि गणेशखिंड रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे विद्यापीठ चौक ते महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद संस्था असा पर्याची मार्ग तयार केला जाणार आहे. यासाठी कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेने जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. मनपा आयुक्तांनी गणेशखिंड, बाणेर आणि औंध रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर हा पर्याय काढण्यात आला.
पुण्यातील कात्रज परिसरात गोवा बनावटीच्या मद्याची आणि विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईत लक्झरी बससह गोवा बनावटीचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले. यावेळी एकूण 42 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात गणेश चव्हाण, अक्षय जाधव आणि उमेश चव्हाण यांना अटक करण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील उत्पादन शुल्क विभागाने चार ठिकाणी छापे टाकले. तालुक्यातील निगुडघर परिसरातील बेकायदा बिगरपरवाना दारु आणि ताडी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आलीय. या छाप्यांमध्ये मुद्देमाल जप्त करण्यात आला. बिगरपरवाना मद्यविक्री करणाऱ्या भूषण तारू, नवनाथ मळेकर, जीयाबूर रेहमान, चिनया पामाले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.