पुणे | 8 सप्टेंबर 2023 : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला हे फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत होत्या. त्यांना दिलासा मिळाला आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विरोधी नेत्यांचे फोन टॅपिंग झाल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणात थेट वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांचे नाव घेतले गेले होते. या प्रकरणी दोन्ही एफआयआर रद्द करण्यात आले आहे. यामुळे रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे आता हे प्रकरण संपणार असल्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य गुप्तचर विभाग प्रमुखपदी रश्मी शुक्ला होत्या. त्यांनी विरोधी नेत्यांचे फोन कॉल्स टॅपिंग केल्याचा आरोप झाला होता. संजय राऊत, नाना पटोले आणि एकनाथ खडसे यांचे फोन टॅपिंग झाल्याचा आरोपामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. पुणे येथील प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल झाला होता. यानंतर सीबीआयवर विरोधकांनी टीका केली होती.
विरोधकांची मुस्कटदाबी करुन अधिकाऱ्यांचे प्रमोशन करायचे हे भाजपाचे ठरलेले आहे. यामुळे रश्मी शुक्ला यांना क्लिनचिट मिळणार हे माहिती होते. असे नाना पटोले यांनी म्हटले होते. सीबीआयने कोणत्या आधारावर रश्मी शुक्ला यांना क्लिनचिट दिली, त्याचे उत्तर द्यावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली होती.
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्यावर दोन गुन्हे दाखले झाले होते. पुणे येथे काँग्रेस नेते नाना पटोले यांचे फोन कॉल रेकॉर्ड केल्याचे पहिले प्रकरण होते. त्याप्रकरणी याआधीच सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिला. त्यानंतर मुंबईत संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांच्या प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी खटला चालवण्यास मंजुरी देण्यास राज्य सरकारकडून नकार दिला होता. आता मुंबई उच्च न्यायालयाकडून रश्मी शुक्ला यांना क्लिनचिट मिळाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्ला यांच्या विरोधात नोंदवलेल्या दोन्ही एफआयआर रद्द केले आहेत.