अभिजीत पोटे, पुणे : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग येण्याची दाट शक्यता आहे. राज्यात आगामी महापालिका निवडणुकींचं बिगूल वाजणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागलेला आहे. असं असताना आता भाजप पक्ष महापालिका निवडणुकीसोबतच आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला लागला आहे. विशेष म्हणजे यासाठी भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्रात शड्डू देखील ठोकलाय. जे पी नड्डा यांची आज चंद्रपुरात सभा झाली. चंद्रपुरातील लोकसभेची जागा सध्या काँग्रेसच्या हातात आहे. ती जागा मिळवण्यासाठी भाजप आग्रही आहे. याशिवाय भाजप हात धुवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे लागलाय. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती मतदारसंघात भाजपने याआधीही जोर लावला होता. त्यानंतर भाजप राष्ट्रवादीच्या पुण्यातील शिरुर मतदारसंघात शड्डू ठोकणार आहे. त्यासाठी जे पी नड्डा यांची शिरुरमध्ये विशेष सभा होणार आहे.
भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा येत्या 20 जानेवारीला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरुर मतदारसंघात जे पी नड्डा यांची सभा होणार आहे. भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिलीय.
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली असून त्याच अनुषंगाने नड्डा यांची भोसरी येथे सभा होणार आहे, अशी देखील माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली होती. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रसेच्या शिर्डी येथील शिबिरला अमोल कोल्हे यांनी हजेरी न लावल्याने विविध चर्चांना उधाण आलं होतं.
अमोल कोल्हे यांची भाजपसोबतची जवळीक वाढत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता त्यांना त्यांच्या शिरुर मतदारसंघात खुद्द भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आव्हान देण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे कोल्हे यांच्या भाजपसोबतच्या जवळीक विषयी सुरु असलेल्या चर्चा खोट्या होत्या हे आता सिद्ध झालंय.
दुसरीकडे भाजपकडून शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीतही मोर्चेबांधणी सुरुय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर काही दिवसांपूर्वी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रसेच्या उमेदवाराला पराभव करु, असा दावा केला होता. त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बावनकुळेंना इशारा दिला होता. त्यानंतर अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात वाकयुद्ध रंगलेलं बघायला मिळालं होतं.