बारामती (पुणे) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरात काम करणारे जालिंदर शेंडगे यांचं आज निधन झालं. जालिंदर हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर बारामती येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. जालिंदर शेंडगे यांची फेब्रुवारी महिन्यात तब्येत बिघडली होती. त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच अजित पवार यांनी स्वत: बारामती येथील एका रुग्णालयात फोन करुन त्यांच्या उपचाराची सोय केली होती. काहीही झाले तरी जालिंदर काका बरे झाले पाहिजेत, अशी ताकिदच त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्याची माहिती त्यावेळी समोर आली होती.
जालिंदर शेंडगे यांचे पवार कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे संबंध
जालिंदर शेंडगे वयाच्या सोळाव्या वर्षापासून अजित पवारांच्या घरी काम करत होते. त्यांचं लहानपणीच आई-वडिलांचं छत्र हरपल्यानं अजित पवारांचे वडील अनंतराव पवार आणि आई आशाताई पवार यांनीच त्यांचा सांभाळ केला. त्यामुळे जालिंदर शेंडगे यांचे पवार कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे संबंध राहिलेत. अगदी अजित पवारांना शाळेत सायकलवर नेण्यापासून ते घरातील सर्व कामे जालिंदर शेंडगे करायचे. त्यांना पवार कुटुंबियांनी कधी अंतरच दिलं नाही. अगदी त्यांची हृदय शस्त्रक्रियाही अजितदादांनीच केली होती.
जालिंदर काकांसाठी कार्यक्रमात असलेल्या पवारांचा रुग्णालयाला फोन
फेब्रुवारी महिन्यात जालिंदर शेंडगे यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध झाले. त्यांच्या मुलानं अजित पवारांना फोन करत जालिंदर शेंडगे हे गंभीर असल्याचं सांगितलं. कार्यक्रमात असलेल्या अजित पवारांनी तातडीने फोन करत त्यांच्या उपचाराची सोय केली. काहीही झालं तरी जालिंदर बरे झाले पाहिजेत, अशा सक्त सूचना पवारांनी दिल्या.
आपल्या लहानपणापासूनच सोबत राहिलेले जालिंदर शेंडगे आजारी आहेत हे समजल्यावर अजितदादांची घालमेल सुरु होती. अखेर त्यांच्यावर उपचार सुरु झाल्यावरच ते तणावमुक्त झाले होते. अजित पवारांनी केलेल्या सहकार्यामुळेच आपल्या पतीला तातडीने उपचार मिळून त्यांचा जीव वाचल्याचं जालिंदर शेंडगे यांच्या पत्नी शोभा शेंडगे यांनी सांगितलं होतं. मात्र, आज जालिंदर काकांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली (Jalinder Shendage pass away who worked at Ajit Pawar house in Baramati).
हेही वाचा : महाराष्ट्राच्या भाजप नेत्यांची थेट मोदींकडे तक्रार? ठाकरे म्हणतात, समज द्या!