पुणे | 22 जुलै 2023 : पुणे शहरातील नागरिकांसाठी अनेक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. पुणे शहरात मेट्रो सुरु झाली आहे. मेट्रोचा विस्तार आणखी वाढणार आहे. त्याचवेळी बस प्रवास अधिक चांगला करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) निर्णय घेण्यात आला आहे. पीएमपीच्या ताफ्यात आता नव्या बसेस दाखल होणार आहेत. महिन्याभरात दाखल होणाऱ्या या बसेसमुळे प्रवास अधिक आरामदायी आणि सुखकर होणार आहे.
पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी सूत्र घेतल्यापासून अनेक निर्णयांची अंमलबजावणी सुरु केली आहे. चालकांना शिस्त लावण्यापासून अधिकाऱ्यांनी पीएमपीमध्ये प्रवास करण्यापर्यंतचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी स्वत: पीएमपीमधून प्रवास केला. आता पुणेकरांसाठी नव्या बसेस घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ऑगस्ट महिन्यात या नवीन १९२ वातानुकूलित बस येणार आहेत. या बसमुळे पुणेकरांचा प्रवास अधिक चांगला होणार आहे. या बसेस निगडी, चऱ्होली आणि कोथरूड डेपोतून सुटणार आहे. नवीन बसेस येत असल्यामुळे ‘पीएमपी’चा ताण होणार आहे.
पीएमपीच्या माध्यमातून रोज सुमारे दोन लाख पुणेकर प्रवास करतात. ‘पीएमपी’कडे असणाऱ्या सध्याच्या बसेसपैकी अनेक बसचे आयुर्मान संपलेले आहे. यामुळे ‘पीएमपी’च्या ताफ्यात एकूण ६५० बस टप्पाटप्याने येणार होत्या. ऑगस्ट महिन्यात १९२ बसेस दाखल होत आहे. या नव्या बसेस १२ मीटर लांबीच्या इलेक्ट्रिक स्वरूपाच्या आहेत.
पुणे शहर, पिंपरी चिंचवडमधील ३०० बस थांबे आच्छादित करण्यात येणार आहे. त्यासाठीची बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा, या अटींवर निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. पीएमपीचे पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये पाच हजार बस थांबे आहेत. त्यातील अनेक ठिकाणी शेड नाही. यामुळे प्रवाशांना उन्हात आणि पावसात उभे राहवे लागते. त्यामुळे शेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पीएमपीच्या सुमारे दोन हजार बस आहेत. या माध्यमातून रोज ३७५ हून अधिक मार्गांवर वाहतूक होते.