पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजप सोबत जाण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. अजित पवार यांनी खुलासा करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मात्र, त्यानंतरही अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा काही थांबता नाहीत. आता या चर्चा सुरू असतानाच त्यात आणखी एका घटनेने भर घातली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीत अजित पवार यांचे नाव नाही. यामुळे पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे.
कर्नाटक विधानसभा लिस्ट जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटक विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. तसेच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात निपनी येथून उत्तम रावसाहेब पाटील यांनी तिकीट दिले आहे. देवार हिप्पारगीमधून मंसूर साहब बिलागी, बासवन बागेवाडीमधून जमीर अहमद इनामदार यांना मैदानात उतरवले आहे. तसेच नागथनमधून कुलप्पा चव्हाण, येलबुर्गामधून हरि आर, रानीबेन्नूरमधून माजी मंत्री आर शंकर, हगरी बोम्मनहल्ली यांना सुगुनामधून उमेदवारी दिली आहे. विराजपेठमधून एस वाई एम मसूद फौजदार तर नरसिम्हराजा येथून रेहाना बानो यांना तिकीट दिले आहे.
स्टार प्रचारक जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटक विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात अजित पवार यांचे नाव नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीत शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांच्यांसह १५ जणांना स्टार प्रचारक केले आहे. परंतु अजित पवार यांचे नाव नसल्याने चर्चा सुरु झाली आहे.
पुण्यात लागले बॅनर
अजित पवार यांनी काल एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी २०२४ ला का आताच मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हटलं होतं. त्यानंतर संध्याकाळी अचानक कोथरूडमध्ये अजितदादांचे बॅनर्स लागले. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं या बॅनर्सवर लिहिलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू अजित पवार… असंही बॅनर्सवर लिहिलं आहे. या बॅनर्सवर अजितदादा पवार यांचा भला मोठा फोटो आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावले आहेत.
गेल्या दहा दिवसांपासून राज्याचं राजकारण अजित पवार यांच्या भोवती फिरत आहे. अजित पवार आधी नॉट रिचेबल झाल्याने तर्कांना उधाण आलं होतं. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करून अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याचा दावा केला. त्यामुळे अजितदादा हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या वृत्तात काहीही तथ्य नसल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं. अजित पवार यांनीही या अफवा असल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम दिला होता.