पुणे : काँग्रेसनं (Congress) एक व्हिडीओ व्हायरल केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्हिडीओचं ठिकाण हे कसबा (Kasba) मतदारसंघातील सोमवार पेठ आहे. काँग्रेसच्या आरोपानुसार या इमारतीच्या वरच्या माळ्यावर भाजप कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटत होते. त्याच्याच शोधासाठी काँग्रेस समर्थक तिथं पोहोचले. आणि पुढे काय झालं ते व्हिडीओत दिसतंय. जेव्हा काँग्रेस कार्यकर्ते वरच्या मजल्यावर पोहोचले, तेव्हा तिथल्या काही भाजप कार्यकर्त्यांच्या हातात यादी होती, आणि बाजूला काही मतदारही बसले होते. समोरुन लोक आल्याचं पाहून या रुममधली हालचाल वाढली. खुर्चीवरुन उठलेला व्यक्ती बाजूच्या व्यक्तीला इशाऱ्यानं यादी बंद करायला सांगतो आणि नंतर सगळे लोक इथून बाहेर पडू लागतात.
याच गदारोळादरम्यान भाजपचे नगरसेवक गणेश बीडकर इथं पोहोचतात. आणि दोन्हीकडच्या समर्थकांमध्ये बाचाबाची होती. भाजपचे गणेश बीडकर व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर धावून जाताना दिसतात. काँग्रेस म्हणतं की इथं भाजपकडून पैसे वाटप सुरु होतं, त्यामुळे याविरोधात गुन्हा दाखल व्हायला हवा. भाजपनं म्हटलंय की आम्ही लोकांना मतदानाची प्रक्रिया समजावून सांगत होतो, मात्र जर प्रक्रिया समजावून सांगत होते, तर मग पळापळ का झाली? असा आरोप काँग्रेसनं केलाय.
यानंतर दुसरा व्हायरल व्हिडीओ गंजपेठेतला आहे. मतदानासाठी पैसे न घेतल्यामुळे भाजपचे नगरसेवक विष्णू अप्पा हरिहर यांनी मारहाण केल्याचा आरोप महिलांनी केलाय. आरोपानुसार आधी दुपारी किरकोळ आणि रात्री सव्वा दोनच्या दरम्यान इथं मोठा वाद झाला. काँग्रेस आणि स्थानिकांनी घडलेल्या प्रकाराबद्दल गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या दिला. त्यानंतर रात्री उशिरा भाजपचे विष्णू अप्पा हरिहर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला गेलाय. दरम्यान भाजपनं साऱ्या आरोपांना खोटं ठरवलंय.
दुसरीकडे राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंनी शेअर केलेला एक फोटोही वादात सापडला. काँग्रेसच्या हेमंत धंगेकरांना मतदान केल्याचा फोटो त्यांनी ट्विट केला. टीकेनंतर हा फोटो दुसऱ्यानं पाठवल्याची सारवासारव त्यांनी केली. भाजपचे उमेदवार हेमंत रासने सुद्धा भाजपचा गमचा घालून मतदान केंद्रावर पोहोचले. विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर चुकून गमचा खांद्यावरच राहिल्याचं कारण रासनेंनी दिलं.
तिकडे चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे आणि भाजप समर्थकांमध्ये झटापट झाली. कलाटे समर्थक गणेश जगताप आणि भाजप नगरसेवक सागर अंघोळकरांमध्ये हा वाद झाला. मतदान केंद्राच्या शंभर मीटर आत का थांबले? यावरुन वादाची सुरुवात झाली. पोलिसांच्य मध्यस्थीनं हा वाद मिटला.