पुणे : मावळातील तळेगांव दाभाडे येथे जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे यांची काल दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. तळेगाव अज्ञात हल्लेखोरांनी आवारे यांच्यावर आधी गोळ्या झाडल्या त्यानंतर धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार करून फरार झाले. या घटनेने फक्त तळेगावच नाही तर संपूर्ण पुणे शहर हादरून गेले आहे. या हत्येच्या निषेधार्थ तळेगाव परिसरात व्यापाऱ्यांनी उत्सफुर्त बंद पुकारला होता. या घटनेला काही तासही उलटत नाही तोच या प्रकरणाला वेगळे वळण लागलं आहे. किशोर आवारे यांच्या आईने थेट राष्ट्रवादीच्या आमदारावरच हत्येप्रकरणी आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
या हत्येचा कट मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंनी रचल्याचा आरोप आवारे यांच्या आईने केला आहे. एफआयआरमध्ये आमदार सुनील शेळके, त्यांचे भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकरसह अन्य तीन अनोळखी इसमांचा उल्लेख आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. श्याम निगडकरने साथीदारांच्या मदतीने आवारे यांची नगरपरिषदेसमोरच गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या केली.
आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके आणि संदीप गराडे यांनी कटकारस्थान रचून त्यांचाच साथीदार श्यामला ही हत्या करायला लावली, असा आरोप किशोर आवारे यांच्या आईने एफआयआरमध्ये केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आमदार सुनील शेळके यांच्याकडून या आरोपांवर अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.
पोलिसांनाही आता आवारे यांच्या आईच्या आरोपाची गंभीर दखल घ्यावी लागणार असून त्यानुसार तपास करावा लागणार आहे. एफआयआरमध्ये ज्यांच्या ज्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे, त्यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्याची मागणीही आता होत आहे. त्यामुळे पोलिसांवर दबाव वाढला असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
नगरपरिषद कार्यालासमोरच काल ही धक्कादायक घटना घडली होती. किशोर आवारे त्यांच्या कार्यालयातून बाहेर येताच, दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात किशोर आवारे हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
चार अज्ञात हल्लेखोरांनी ही हत्या केल्याचं उघड झाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस या हल्लेखोरांचा शोध घेत होते. गेल्या काही दिवसांपासून सोमाटणे टोलनाका टोलमुक्त व्हावा यासाठी किशोर आवारे हे सोमटाने टोलनाका हटाव कृती समितीच्या माध्यमातून लढा देत होते. त्यामुळे अनेकांना आवारे यांचं हे आंदोलन खूपत नसल्याचं सांगितलं जात होतं. त्यातूनच ही हत्या झाली का? असा संशयही व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, मावळातील तळेगांव दाभाडे येथे जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे यांच्या हत्येच्या निषेधार्थ तळेगांव परिसरातील दुकाने व्यापाऱ्यांनी बंद केली होती. या हत्याकांडानंतर प्रत्येक चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संशयितांवर पोलीस वॉच ठेवून आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस सतर्क झाले आहेत. तळेगाव परिसरात सध्या तरी तणावपूर्ण शांतता आहे.