अभिजित पोते, पुणे : कोयता गँगच्या (koyta gang) विरोधात पुणे पोलिसांच्या (Crime News) धडक कारवाया सुरु आहेत. या गँगचा म्होरक्यासह अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. काही जणांवर मकोका लावण्यात आला आहे. काही जणांना हद्दपार करण्यात आले आहे. कोयताची विक्री करताना आधारकार्डची सक्ती करण्यात आली आहे. या सर्व उपायानंतरही आता पुन्हा कोयता गँगने डोकेवर काढले आहे. आता पुण्यातील वारजे भागात कोयता गँगने गाड्यांच्या काचा फोडल्या आहेत.
पुणे शहरातील वारजे कॅनॉल रस्त्यावर कोयता गँगकडून ७ गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. वारजे रामनगर कॅनॉल रस्त्यावर नागेश्वर महादेव मंदिर येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एकूण 7 वाहनांची कोयता गँगने तोडफोड केली. वारजेतील रामनगर कॅनॉल रस्त्यावर सोमवारी 19 जून रोजी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. काळ्या रंगाच्या ॲक्टीव्हा दुचाकीवरून गेलेल्या 3 व्यक्तींनी हा प्रकार केला असावा अशी शक्यता आहे. याबाबत स्थानिक गाडी मालकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वारजे माळवाडी पोलीस दाखल होत. पोलिसांकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
कोयत्या गँगने दोन ऑटो रिक्षा, एक महिंद्रा झायलो, एक इको कार, तसेच एका सफारी कार अन् दोन दुचाकींचा समावेश आहे. 2017 नंतर रामनगर परिसरात वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार थांबला होता. परंतु दोन दिवसांपूर्वीच रामनगर परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर टवाळखोरांनी पुन्हा तोंडवर काढून सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. या परिसरात नागरिक संतप्त झाले आहेत. यावर योग्य ती कारवाई करीत रामनगर परीसरात पोलीस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कोयता गँगकडे भाई-दादांचा रुबाबामुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत आहे. यामुळे पोलिसांनी शाळांमध्ये समुपदेशन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2022 मध्ये 303 गुन्ह्यांत 476 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यापैकी 42 मुलांचा मागे कोणत्या अन् कोणत्या गुन्हेगारांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, गंभीर दुखापत असे गुन्हे या मुलांवर दाखल होते.