प्रदीप कापसे, पुणे | 5 डिसेंबर 2023 : ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे पोलीस आक्रमक झाले आहे. पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत कर्मचारी आणि ललित पाटील याचे मित्र आणि नातेवाईकांना अटक झाली. मात्र आता या प्रकरणात प्रथमच दोन बड्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पुणे येथील येरवडा कारागृह प्रशासनाच्या रडारवर आले आहे. पुणे पोलिसांनी कारागृहातील समुपदेशक आणि वैद्यकीय अधिकारी अशा दोन जणांना अटक केली आहे. प्रथमच मोठ्या अधिकाऱ्यांना अटक झाली आहे. यामुळे कारागृह प्रशासनातील गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे.
पुणे पोलिसांनी कारागृहातील समुपदेशक सुधाकर इंगळे यांना अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून येरवडा कारागृहाचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. संजय मरसाळे यांचे नाव समोर आले. सुधाकर इंगळेमार्फत डॉ. संजय मरसळे यांना पैसे मिळाल्याचा दावा पुणे पोलिसांनी न्यायालयात केला. त्यानंतर पुणे पोलिसांनी सुधाकर इंगळे आणि डॉक्टर संजय मरसळे या दोघांना अटक केली आहे.
डॉक्टर संजय मरसळे हा ललित पाटील पळून जाण्याच्या २ दिवस आधी त्याच्याशी संपर्कात होता. डॉ. संजय मरसळे याने पैसे घेऊन ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी शिफारस केली होती. यानंतर पोलिसांनी डॉक्टर संजय मरसळे याच्या मोबाईलची तपासणी केली. त्यात त्यांना अभिषेक बलकवडे याचे कॉल मिळाले. बलकवडे हा ललित पाटील याचा ड्रग्स कंपनी सांभाळणारा साथीदार आहे.
ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहानंतर ससूनमधील एका बड्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. ससून रुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी प्रवीण देवकाते याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. ललित पाटील याला मदत केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याला याआधी निलंबित करण्यात आले होते. ललित पाटीलला याला पळून जाण्यास देखील देवकाते यांनी मदत केल्याचा पुणे पोलिसांचा आरोप आहे.