पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कामशेत बोगद्याजवळ ढिगारा कोसळला

| Updated on: Jul 27, 2023 | 10:08 PM

पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पुन्हा एकदा मातीचा ढिगारा कोसळला आहे. त्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम पडलाय. विशेष म्हणजे गेल्या चार दिवसातील ही तिसरी घटना आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कामशेत बोगद्याजवळ ढिगारा कोसळला
Follow us on

पुणे | 27 जुलै 2023 : महाराष्ट्रात प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक नद्या दुधडी भरुन वाहत आहेत. अनेक नद्यांना पूर आलाय. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड धाकधूक वाढली आहे. मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या देखील घटना घडत आहेत. हवामान विभागाकडून गेल्या आठवड्यापासून पुणे आणि घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय. रायगडच्या कर्जत, तसेच लोणावळा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडतोय. त्याचा फटका पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दिसतोय. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतुकीवर परिणाम पाडणारी आणखी एक घटना समोर आली आहे. कामशेत बोगद्याजवळ मातीचा ढिगारा कोसळला आहे.

पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पुन्हा एकदा मातीचा ढिगारा कोसळला आहे. कामशेत बोगद्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरच ही घटना घडली आहे. आज रात्री पावणे नऊ वाजता संबंधित घटना घडली. या घटनेनंतर एका लेनवरून वाहतूक सुरू आहे. काही वेळात मातीचा हा ढिगारा बाजूला केल्यानंतर उर्वरित दोन लेनही सुरू केल्या जातील.

चार दिवसांतील आजची तिसरी घटना

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 23 जुलैला रविवारी रात्री साडेदहा वाजता दरडीची पहिली घटना घडली होती. ही घटना मुंबई मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ घडली होती. तर दुसरी दरड त्याच मध्यरात्री तीन वाजता लोणावळ्याजवळ कोसळली होती. चार दिवसानंतर ही तिसरी घटना घडलेली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, वाहतूक ही सुरळीत सुरु आहे.

ठाणे जिल्ह्यात शाळांना सुट्टी, तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट

राज्यभरात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाकडून विशेषत: मुंबई, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, नागपूर, गोंदिया, भंडारा, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, बलदापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडी या शहरांमध्ये प्रचंड पाऊस पडत असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील शाळांना प्रशासनाकडून उद्यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.