जयवंत शिरतार, टीव्ही 9 मराठी, जुन्नर : जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबांना अवघड होत असल्याचं दिसतंय. पुण्यातील जुन्नर तालुक्यात राजुरी येथे बिबट्याने एक 3 वर्षीय चिमुकल्यावरच हल्ला केला. बिबट्यानं राजूरच्या गव्हाळी मळयात राहणाऱ्या चासकर कुटुंबातील हे 3 वर्षांचं बाळ अंगणातून फरफटत ऊसात नेलं. या बिबट्याच्या हल्ल्यात हे बाळ गंभीर जखमी झालंय. रविवारी रात्री 9.30 ते 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. वेद अक्षय चासकर असं या चिमुकल्याचं नाव आहे.
जुन्नरमधील गव्हाळी मळ्यात रहात असलेल्या अक्षय चासकर यांना वेद नावाच 3 वर्षाचा लहान मुलगा आहे. तो रविवारी नेहमीप्रमाणे अंगणात खेळत होता. याचवेळी अचानक बिबटयाने या बाळावर जीवघेणा हल्ला केला. बिबट्यानं बाळाला तोंडात पकडून फरफटत शेजारच्या ऊसाच्या शेतात नेलं. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्यानं बाळ रडायला लागलं. हा रडण्याचा मोठा आवाज आल्यानंतर घरातील लोक बाहेर आले. तेव्हा त्यांना बाळाला बिबट्यानं नेल्याचं लक्षात आलं.
VIDEO : अंगणातून फरफटत ऊसाच्या शेतात नेलं, जुन्नरमध्ये 3 वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला@MahaForest #Leopard #LeopardAttack #Junnar #Pune pic.twitter.com/x4xVrG07Rb
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) August 30, 2021
बाळावरील बिबट्याच्या हल्ल्याचा अंदाज येताच कुटुंबातील सदस्य आणि स्थानिक नागरिकांनी ऊसाच्या शेतात घेराव घातला. सर्वांनी शेतात जाऊन मोठमोठ्यानं आरडाओरडा केला. मोठा आवाज आल्यानं बिबट्यानं त्या मुलाला शेतात सोडून या ठिकाणाहून पळ काढला. या ठिकाणी स्थानिक नागरिक पोहचल्यानंतर पाहिलं असता बाळ बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालं होतं. त्यामुळे जखमी बाळाला तातडीने दवाखान्यात हलवण्यात आलं.
सुरुवातीला जखमी बाळाला आळेफाटा येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात बाळ गंभीर जखमी झाल्यानं बाळाला तेथून पुण्यात पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं.
दरम्यान आळेफाटा परीसरात दिवसेंदिवस बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना वाढत आहेत. नागरीकांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले होत असतानाही वन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. या परिसरातील ग्रामस्थांनी राजुरी परिसरात पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी केलीय. आता या हल्ल्यानंतर तरी वनविभाग काही उपाययोजना करतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Leopard attack on 3 year baby in Junnar Pune