पुणे | 17 ऑक्टोंबर 2023 : सर्वसामान्य प्रवासी एसटीने प्रवास करतात. लाखो व्यक्ती रोज एसटी बसमधून प्रवास करत असतात. एसटीमधून प्रवास करणाऱ्यांना महिला प्रवाशांना अर्ध्या तिकीटात प्रवास करता येते. वरिष्ठ नागरिकांनाही अर्ध्या तिकीटात प्रवास करण्याची सवलत आहे. तसेच ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करण्याची सवलत दिली जाते. यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आता एसटी बसही काळाप्रमाणे बदलत आहे. तुम्हाला तुमची एसटी कुठे आहे, समजणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाने सर्व बसेसला व्हेईकल ट्रॅकींग सिस्टीम बसवली आहे.
काळाप्रमाणे एसटी बदलत आहे. एसटीने व्हेईकल ट्रॅकींग सिस्टीम बसवल्यामुळे एसटी सध्या कुठे आहे, हे कळणार आहे. तसेच बस पुढच्या थांब्यावर किती वाजपर्यंत पोहचणार आहे, हे समजणार आहे. ही सेवा येत्या नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. यामुळे प्रवाशांना एसटीची वाट पाहत बसस्थानकावर थांबावे लागणार नाही. तसेच चौकशी कशात जाऊन बस केव्हा येणार? याची चौकशी करण्याची गरज पडणार नाही.
एसटीने स्वत:चे अॅप विकसित केले आहे. हे अॅप नोव्हेंबर महिन्यापासून सुरु होणार आहे. या अॅपमध्ये बसचे लाईव्ह लोकेशन कळणार आहे. बस स्थानकावरुन बस निघालेल्या मार्गावर ठरविक ठिकाणी जात आहे की नाही, ही माहिती कळणार आहे. यामुळे बेशिस्त वाहन चालकांवर अंकुश ठेवता येणार आहे. बस थांब्यावर थांबली नाही तरी ही माहिती समजणार आहे. त्या माहितीचा वापर करुन चालकावर कारवाई करता येणार आहे.
पुणे येथील स्वारगेट बस स्थानकावर इलेक्ट्रीक फलक बसवले जात आहे. या फलकाच्या माध्यमातून आगारातील सर्व बसेसची माहिती दिली जाते. तसेच नवीन प्रणालीमुळे बस कुठे, कोणत्या ठिकाणी, किती वेळ थांबली? ही माहिती मिळणार आहे. अनधिकृत ठिकाणी बस थांबली असेल तर का थांबली? याची शहनिशा ट्रॅकिंगमुळे शक्य होणार आहे. या प्रणालीमुळे कामचुकार बसचालकांना वचक बसेल, असे स्वारगेट आगाराचे प्रमुख भूषण सूर्यवंशी यांनी सांगितले.