संदीप शिंदे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, सोलापूर | 9 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर मोठं भाष्य केलं आहे. या निवडणुका कदी होणार याची भविष्यवाणीच केली आहे. देशात येत्या फेब्रुवारीत लोकसभेच्या निवडणुका लागतील. तर एक वर्षानंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील. पण मध्येच सरकार पडलं तर काही सांगता येत नाही, असा मोठा दावा आणि भविष्यवाणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे या कुर्डूवाडी येथे आल्या होत्या. यावेळी एका मेळाव्यात बोलताना त्यांनी हा दावा केला. लोकसभा निवडणुका फेब्रुवारीमध्ये लागतील. तर विधानसभा निवडणुका एक वर्षाने लागेल. मात्र मध्येच सरकार पडले तर काही सांगता येत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ट्रिपल इंजिन खोके सरकारने शाळा कमी केल्या आणि दारुची दुकाने वाढवली, अशी टीकाही त्यांनी केली.
निवडणुक आयोगाच्या तारखा कश्या यांना माहिती होतात? अदृश्य शक्ती महाराष्ट्राचे मोठं नुकसान करत आहे. आर.आर.आबा पाटील यांच्या सारखा गृहमंत्री असायला हवा होता. जालन्यात मराठा महिला आंदोलकांना मारायला लावणारा नसावा, असा टोलाही त्यांनी लगावला.
महाराष्ट्रात जो कोणी मोठा होतोय. त्याचे खच्चीकरण करण्याचे काम अदृश्य शक्ती करत आहे. 50 खोके देऊन पक्ष फोडले, घरे फोडले हे सगळं पाप अदृश्य शक्ती करत आहे. ही अदृश्य शक्ती दिल्लीत आहे. बाबासाहेब ठाकरे, शरद पवार, नितीन गडकरी, देवेद्र फडणवीस या चौघा नेत्यांच्या विरोधातच ही अदृश्य शक्ती काम करते, अशी टीका त्यांनी अमित शाह यांचं नाव न घेता केली.
मुख्यमंत्रीपदावरून सत्ताधाऱ्यांकडून विधाने येत आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहणाऱ्या अजितदादासह अन्य सर्व इच्छुकांना माझ्या शुभेच्छा आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
मी फुटलेल्या गटासारखी नाही. माझे पोट खूप मोठं आहे. काही गोष्टी पोटातच ठेवाव्या लागतात. तो महिलांचा उपजत गुण आहे. ती मॅच्युरिटी माझ्यात आहे, असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.