‘जागृत पुणेकर’ मोहीम, पाच वर्ष पक्ष सोडणार नाही…पुणे शहरातील या बॅनरची देशभरात चर्चा

| Updated on: Apr 02, 2024 | 11:42 AM

Lok Sabha Election Maharashtra Politics: ‘जागृत पुणेकर’ या नावाने लावण्यात आलेल्या बॅनर्सवर कोणत्याही संस्था किंवा व्यक्तीचे नाव नाही. त्यामुळे हे बॅनर्स कोणी लावले आहे? त्याची काहीच माहिती नाही. परंतु लोकसभा निवडणुकीत आयाराम-गयाराम उमेदवारांना चाप लावणारे या पोस्टर्सची चर्चा देशात होऊ लागली आहे.

‘जागृत पुणेकर’ मोहीम, पाच वर्ष पक्ष सोडणार नाही...पुणे शहरातील या बॅनरची देशभरात चर्चा
पुणे शहरात लावण्यात आलेले पोस्टर्स
Follow us on

राजकारणातील सध्याच्या परिस्थितीवर वारंवार चिंता व्यक्त केली जात आहे. आज या पक्षात असणारा उमेदवार दुसऱ्या पक्षात कधी जाईल, हे सांगता येत नाही. आयाराम-गयारामसंदर्भात कायदे झाले. परंतु त्यातून पळवाट काढल्या जात आहेत. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात दोन वेळा बंड झाले. या सर्व प्रकारामुळे पुणेकरांनी अनोखा तोडगा काढला आहे. ‘जागृत पुणेकर’ नावाने एक मोहीम सुरु केली आहे. ‘जागृत पुणेकर’ नावाने शहरात पोस्टर्स लावले गेले आहेत. त्यात पाच वर्ष पक्ष बदलणार नाही, अशी हमी इच्छूक उमेदवारांकडून मागितली गेली आहे.

काय आहे पोस्टर्समध्ये

रहा एक पाऊल पुढे, महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी… या आशयाचे पोस्टर्स तयार करण्यात आले आहे. त्यात आवाहन जागृत पुणेकरांचे असा मथळा दिला आहे. त्यात म्हटले आहे की, उमेदवार मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या. त्यांनी आपल्या परिचय पत्रकामध्ये एकच उल्लेख करावा. “मी आमच्या पक्षाशी व पक्षाच्या ध्येय धोरणाशी आणि मतदारांशी पाच वर्ष प्रामाणिक राहील. कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाही. गेलो तर पुन्हा मला किंवा आमच्या घरातील इतरांना निवडून देऊ नका” असा मजकूर दिला आहे. जे उमेदवार आपल्या परिचय पत्रकात हे लिहितील, त्यांनाच मतदान केले जाईल, असे म्हटले आहे.

बॅनर्सची राज्यात नव्हे देशांत चर्चा

‘जागृत पुणेकर’ या नावाने लावण्यात आलेल्या बॅनर्सवर कोणत्याही संस्था किंवा व्यक्तीचे नाव नाही. त्यामुळे हे बॅनर्स कोणी लावले आहे? त्याची काहीच माहिती नाही. परंतु लोकसभा निवडणुकीत आयाराम-गयाराम उमेदवारांना चाप लावणारे या पोस्टर्सची चर्चा देशात होऊ लागली आहे. सोशल मीडियावर हे बॅनर्स चांगलेच व्हायरल झाले आहे.

हे सुद्धा वाचा

विवेक वेलंकर म्हणतात…

सजग नागरिक मंचचे प्रमुख कार्यकर्ते विवेक वेलंकर यांनी सांगितले की, हे बॅनर्स कोणी लावले, त्याची माहिती नाही. परंतु या माध्यमातून जे आवाहन केले आहे, त्याला आमचाही पाठिंबा आहे. गेल्या काही वर्षांपासून राजकारणात झालेल्या बदलामुळे लोकांनाच पुढकार घेऊन हमी घ्यावी लागत आहे.