पुण्याजवळील लोणावळ्यात पर्यटनासाठी राज्यभरातून पर्यटक येत असतात. पावसामुळे सुरु झाल्यानंतर लोणावळ्यातील सौदर्यं आणि धबधबे पाहण्यासाठी गर्दी होत असते. त्यामुळे या काळात लोणावळ्यात चांगलीच गर्दी असते. पर्यटनासाठी असलेल्या पर्यटकांमध्ये वाद झाल्याची घटना नुकतीच लोणावळ्यात घडली. या वादामुळे संतापलेल्या युवकाने प्राण धोक्यात आणणारा निर्णय घेतला. नशीब बलवत्तर होते म्हणून तो वाचला. त्या युवकाने राजमाची पॉईंटवरील कड्यावरुन उतरण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी असलेल्या लोखंडी जाळीमुळे तो वाचला.
लोणावळ्यात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या एका ग्रुपमधील युवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे त्यातील एका पर्यटकाने रागाच्या भरात डोंगर माथ्यावरून थेट खंडाळ्यातील राजमाची पॉईंट येथील खोल दरीत धोकादायक कड्यावरून खाली उतरण्याचा जीवघेणा प्रयत्न केला. सुदैवाने राजमाची पॉईंट खालून जाणाऱ्या एक्सप्रेस हायवेवर दरड कोसळू नये यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी जाळीचा आधार त्याला मिळाला. यामुळे तो सुखरूप खाली रस्त्यापर्यंत उतरू शकला.
राजमाची पॉईंटवरुन एक युवक उतरत असल्याची बातमी पसरली. एक युवक धोकादायकरित्या दरीत उतरला असल्यामुळे खळबळ माजली. त्यामुळे या तरुणाला बाहेर काढण्यासाठी लोणावळा शिवदुर्ग बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्याच्यासाठी शोध मोहीम राबवली. मात्र हा तरुण खाली उतरून गेल्याचे समजल्याने ही मोहीम थांबवण्यात आली.
संबंधित पर्यटकाला खंडाळा बोरघाट दस्तुरी महामार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला समज देऊन सोडून दिले. या घटनेत संबंधित पर्यटक सुखरूप असला तरीही त्याचा हा जीवघेणा प्रयत्न त्याच्या जीवांवर बेतू शकला असता. तसेच त्यामुळे इतर लोकही अडचणीत आले असते. या प्रकाराची चर्चा परिसरात रंगली होती. तो पर्यटक आणि ग्रुपमधील इतर जणांमध्ये वाद का निर्माण झाला? याचे कारण समोर आले नाही.