पुणे : महाविकास आघाडीत फूट पडणार आहे. त्यांच्या वज्रमूठीला भेगा पडल्या आहेत. 2024च्या निवडणुकीत भाजपच विजयी होईल. महाराष्ट्रात लोकसभेच्या 45 जागांवर भाजप आणि शिंदे गट विजयी होईल असा दावाही भाजपकडून केला जात आहे. कालपर्यंत भाजप नेत्यांचा हा दावा सुरू होता. मात्र, या दाव्याला भाजपचे नेतेच चंद्रकांत पाटील यांनी छेद दिला आहे. त्यांनी 2024ची लोकसभा निवडणूक ही आधीच्या दोन्ही लोकसभा निवडणुकी इतकी सोपी नसल्याचा दावा केला आहे. तसेच महाविकास आघाडीचं ऐक्य तुटणार नाही, असं भाकीतही चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या रोखठोक विधानाने भाजप नेत्यांना टेन्शन आलं आहे.
शिरुर तालुक्यात भाजप बुथ प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला चंद्रकांत पाटील यांनी संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या देत पुढील निवडणूक किती अवघड आहे हे स्पष्ट केलं. 2014 आणि 2019च्या निवडणुका बघता पुढील निवडणूक सोप्पी नाही. 2019 मध्ये आपल्यासोबत असलेले अघोषित होते. तेच आता 2024 मध्ये घोषित निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे आपल्या आपल्या प्रभागातील प्रश्न सोडवावे लागणार आहेत. प्रभागात लक्ष द्यावे लागणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
2009 ला गिरीश बापटांना कसब्यात 53 हजार मत पडली. त्यावेळी दोन विरोधी उमेदवारांना 86 हजार मत पडली, आता मात्र दोन उमेदवार थेट भिडले. उरलेल्या उमेदवारांना नोटासहीत 10 हजार मते पडली. त्यामुळे हे भाजप फेमिकॉल आहे (भाजप हे फेमिकॉल सारखा ब्रँड आहे त्यामुळे विरोधक एकत्र येत आहेत) भाजपला पराभूत करता येत नसल्याने ते एकत्र येत आहेत. बापट यांच्यापेक्षा अधिक मते मिळून आपला उमेदवार पराभूत झाला. कारण थेट लढत झाली. त्यांच्यात बंडखोरी झाली नाही. कारण, त्यांच्यात फेविकॉल होता. त्यांची इथून पुढे युती तुटेल हे गृहीत धरू नका, असं पाटील म्हणाले.
लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आपल्याला घाबरून विरोधक एकत्रच येणार हे गृहीत धरलं पाहिजे. आपल्याबद्दलची भीती हे त्यांचं फेविकॉल आहे. फेवीकॉल ला नाव आहे ‘भाजपा’….घाबरून हे एकत्र काम करत आहेत. आपण मरू, अशी भावना त्यांच्यात आहे, असंही ते म्हणाले.
शिरूर तालुक्यापासून दौऱ्याचा नवा पटर्न सुरू केला आहे. 10 आठवड्यात संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करणे असा आहा पॅटर्न आहे आणि हा पटर्न मी यशस्वी करणार आहे. कार्यक्रमाचे पॅटर्न बदलावेत असं माझं म्हणणं आहे. फार तर 35 मिनिटं कार्यक्रम असावा. प्रत्येकाचे नाव, सगळ्यांचे सत्कार, कमी वेळेत बोलावे, फटाके वाजवू नयेत तसेच स्वछतेचे पाईक व्हायला पाहिजे, असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. आज या दौऱ्यात जो जे मागत होता त्यांना ते दिलं. त्यात विरोधी पक्षाना देखील नाराज केलं नाही, असं सांगतानाच मी दिवसाचे 16 तास काम करतो, असंही ते म्हणाले.