पुणे : पिंपरी चिंचवड आणि कसबा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरु झाले आहे. या निवडणुकीत उमेदवारी दाखल झाल्यापासून कोणत्या उमेदवाराने किती खर्च केला त्याचा तपशील आलाय. कसबा मतदारसंघातील निवडणूक रिंगणात १६ उमेदवार आहेत. खर्च करताना सर्वच उमेदवार मागे राहिले आहे. मर्यादेपेक्षा २५ टक्के पण खर्च प्रमुख उमेदवारांनी केला नाही. भाजप उमेदवार हेमंत रासने, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनीच दहा लाखांच्या जवळपास खर्च केला आहे. अपक्ष उमेदवार आनंद दवेचा खर्च दीड लाखांच्या जवळपास आहे. ४० लाखांची मर्यादा असतानाही कोणत्याही उमेदवारांने जास्त खर्च केला नाही. यामुळे पुणे कसबा पेठेतील निवडणूक वेगळी ठरली आहे.
कोणी किती केला खर्च
काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सर्वाधिक ११ लाख ६० हजार २९ रुपये खर्च केला आहे. त्यानंतर भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी ८ लाख ९४ हजार १७६ रुपये खर्च केला आहे. अपक्ष उमेदवार आनंद दवे यांनी १ लाख ४५ हजार ७१९ रुपये खर्च केला आहे. त्यामुळे पुणेकर उमेदवारांनी प्रचार खर्च करताना हात आडखळताच घेतला आहे. परंतु त्यांच्या या प्रकारचेही कौतूक होत आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये जास्त खर्च
राष्ट्रवादीचे विठ्ठल उर्फ नाना काटे २५ लाख ५९ हजार ५९६ लाखांचा खर्च केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या अश्विनी जगताप यांनी २४ लाख २३ हजार ९१४ प्रचार खर्च दाखवला आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी चांगलाच खर्च केला आहे. त्यांनी प्रचारासाठी २२ लाख ५७ हजार ९८७ रुपये खर्च करुन निवडणुकीच्या रणांगणात आपणही असल्याचे दाखवून दिलेय. सर्वात कमी खर्च अपक्ष उमेदवार चंद्रकांत मोटे यांनी केला आहे. त्यांनी केवळ ५ हजार ९०६ रुपये खर्च केला आहे. एकूण सर्व उमेदवारांनी मिळून १४ कोटी १० लाख ९६ हजार रुपये खर्च केला आहे.
काय होती मर्यादा
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये करण्यात आली होती. यापुर्वी सन २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ही मर्यादा २८ लाख रुपये होती. परंतु पोटनिवडणुकीसाठी वाढ करण्यात आली होती.
पुणे कसबा पेठेतील उमेदवारांनी खर्च करताना मिनीमीलीज्मचा वापर केला. मेनीमीलीज्म म्हणजे कमी खर्च करणे नसून जे गरजेचे आहे त्याची खरेदी करणे इतकेच आहे.