योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येतेय. भाजप काँग्रेसला एक भलंमोठं खिंडार पाडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या सुरु झालीय. कारण काँग्रेसच्या एका दिग्गज नेत्याने भाजप नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे पडद्यामागे महत्त्वाच्या घडामोडी घडत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे संबंधित काँग्रेस नेत्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बारामती दौऱ्याकडे पाठ फिरवलीय आणि ते देवेंद्र फडणवीस उपस्थित असलेल्या कार्यक्रमस्थळी गेले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते संग्राम थोपटे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती समोर आलीय. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि संग्राम थोपटे यांची भेट झालीय.
विशेष म्हणजे नाना पटोले सध्या बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. असं असताना संग्राम थोपटे यांनी नाना पटोले यांच्या बारामती दौऱ्याकडे पाठ फिरवली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून संग्राम थोपटे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झालीय. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि संग्राम थोपटे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय.
कोण आहेत संग्राम थोपटे?
संग्राम थोपटे हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. ते पुणे जिल्ह्यातील भोर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात. संग्राम थोपटे तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल, अशी आशा त्यांना होती. मात्र मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुणे काँग्रेस कार्यालयात तोडफोड केली होती. त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा होती. पण त्यांची ती इच्छा देखील काही कारणास्तव पूर्ण होऊ शकली नाहीय.
20 नगरसेवकांचे राजीनामे
थोपटे यांना मंत्रिपद न मिळाल्याने नाराज समर्थकांनी केवळ काँग्रेस कार्यलायाची तोडफोड केली नाही. तर भोर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा, उपनराध्यक्षांसह 20 नगरसेवकांनी पदाचे राजीनामे दिलो होते. भोर मतदारसंघातील काँग्रेस कमिटीच्या अनेक सदस्यांनीही राजीनामे देत समित्या बरखास्त केल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना हस्तक्षेप करून ही नाराजी दूर करावी लागली होतं.
वडील सहावेळा आमदार
संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. ते तब्बल सहावेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यानंतर संग्राम थोपटे यांनी भोर मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. विशेष म्हणजे 2014 च्या मोदी लाटेतही थोपटे पितापुत्रांनी आपली सत्ता राखली होती.
2009मध्ये झालेल्या परिसीमनानंतर ‘भोर-वेल्हा-मुळशी’ हा मतदारसंघ अस्तित्वात आला. महाडच्या सीमेवरील वरंधा घाटापासून हा मतदारसंघ सुरू होतो. वेल्ह्यातील मढे घाट, लवासा ते मुळशीतील ताम्हिणी घाटापर्यंत हा मतदारसंघ पसरलेला आहे. बऱ्यापैकी ग्रामीण, दुर्गम, डोंगर दऱ्यांतील वस्ती, 7 मोठी धरणे, ऐतिहासिक गडकिल्ले आणि जंगलाखालील क्षेत्राची मोठी व्याप्ती असा हा मतदारंसघ आहे. 1999मधील ‘राष्ट्रवादी’चा अपवाद वगळता मतदारसंघाने कायम काँग्रेसला किंबहूना थोपटे कुटुंबाला साथ दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांनी मतदारसंघाचे 6 वेळा नेतृत्व केले.