लोणावळा: राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार फार काळ टिकणार नसल्याचा पुनरुच्चार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. मुंबई महापालिका निवडणुका संपल्या की मार्चच्या आसपास राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळेल, असं नवं भाकीत रामदास आठवले यांनी केलं आहे. केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री रामदास आठवले यांनीही मार्चमध्ये सरकार कोसळणार असल्याचं भाकीत केलं होतं. त्यानंतर आठवले यांनी मार्चमध्येच सरकार कोसळणार असल्याचं सांगितल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
लोणावळा येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर मीडियाशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी हे भाकीत केलं आहे. महाविकासआघाडीची सत्ता फार काळ टिकणार नाही. त्यामुळे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा फॉर्म्युला भाजप-शिवसेनेनं अवलंबवावा. मुंबई महानगरपालिका निवडणुका संपल्या की चित्र बदलेल. मार्चच्या आसपास महाविकासआघाडी सरकार पडेल आणि भाजप सत्तेत येईल, असं आठवले म्हणाले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावरही आठवले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्व विरोधी नेते एकत्रित येऊन आघाडी करू पाहत आहेत. शरद पवार आणि ममता बॅनर्जी आदी नेते त्यासाठी बैठका घेत आहेत. पण आम्हाला काही फरक पडणार नाही. नरेंद्र मोदींना सत्तेतून हलविणे हे कोण येऱ्यागबाळ्याचे काम नाही, असं आठवले म्हणाले.
दरम्यान, वंचित बहुनज आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यापाठोपाठ आठवले यांनीही भीमसैनिकांना उद्या चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. उद्या महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्ताने देशातील आंबेडकरी अनुयायांनी चैत्यभूमीवर गर्दी करू नये, घरूनच बाबासाहेबांना अभिवादन करावं, असं आवाहन आठवले यांनी केलं.
यावेळी आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्याचा नाराही दिला. सर्व दलित संघटनांनी एकत्रित यावं, अशी सादच आठवले यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने सर्व आंबेडकरी नेत्यांना घातली. रिपब्लिकन पक्षाचा एकच अध्यक्ष बनवूयात. मी अध्यक्षपदासाठी इच्छुक नाही. आता मी एक पाऊल मागे आलोय, आपले ऐक्य दाखविण्यात आपण एकत्र येऊयात, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, लोणावळ्यात कार्यक्रम सुरू असतानाच आठवले यांच्या समोरच रिपाइं कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड बाचाबाची झाली. अध्यक्षपद मिळावं म्हणून कार्यकर्ते आपआपसात भिडले. अचानक सुरू झालेल्या या राड्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं. यावेळी आठवले यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. मात्र, वाद थांबताना दिसत नसल्याचं पाहून आठवले यांनी या गर्दीतून निघून जाणंच पसंत केलं.
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 9 AM | 5 December 2021 pic.twitter.com/mNZ6o6uFia
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 5, 2021
संबंधित बातम्या:
Girish Kuber | ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक, नाशकात साहित्य संमेलन परिसरात प्रकार