पुणे: जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेने जिल्ह्यात यशस्वीपणे राबविलेले कोविडमुक्त गाव अभियान उपयुक्त आहे. पुणे विभागातही याची अंमलबजावणी करावी आणि अभियानाच्या माध्यमातून आपले गाव कोविडमुक्त करण्यासाठी ग्रामस्थांनीदेखील यात सहभाग घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. अभियान संपल्यानंतर ग्रामपंचायतींना बक्षीस दिलं जाणार आहे. पहिलं बक्षीस 50 लाख, दुसरं 25 लाख आणि तिसरं बक्षीस 15 लाखाचं देण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेतर्फे राबविण्यात येणाऱ्या कोविडमुक्त गाव अभियानाच्या जिल्हास्तरीय उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील सरपंचांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. मागील दोन वर्षांपासून आपण कोविड संकटाशी मुकाबला करीत आहोत. हे मानवजातीवर आलेले संकट असल्याने सर्वांनी मिळून ही लढाई लढावी लागेल. नागरिकांनाही या आजाराबाबत गांभीर्य लक्षात आले आहे. दोन वर्षात विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे संकट टाळण्यासाठी ग्रामविकास विभागाच्यावतीने कोविडमुक्त गाव करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ‘बिजेएस’च्या सहकार्याने पुण्यातील काही गावात राबविलेला हा उपक्रम यशस्वी ठरल्याने तो राज्यस्तरावर राबविण्याबाबत मंत्रिमंडळातील इतर सदस्यांना कार्यक्रमाची माहिती देण्यात येईल, असे अजित पवार म्हणाले.
कोणताही उपक्रम वैयक्तिक प्रयत्नाने यशस्वी होत नाही, त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असते. ग्रामीण भारताची सूत्र युवकांच्या हाती जात आहे. त्यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे. महिलांनी आणि युवकांनी निश्चय केल्यास गाव कोविडमुक्त होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोविडमुक्त 44 गावातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे अजित पवार यांनी अभिनंदन केले. जिल्ह्यातील नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच कोविडमुक्त गाव मोहीम राज्यात सुरू करण्याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
प्रास्ताविकात शांतीलाल मुथा यांनी मोहिमेची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. जिल्ह्यातील 550 गावांनी गाव कोविडमुक्त करण्यासाठी कृतीदलाची स्थापना केली आहे. त्यांना बिजेएसतर्फे ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व गावात ही मोहीम राबविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 22 January 2022 #FastNews #BREAKING pic.twitter.com/Dbl7E1XZ4C
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 22, 2022
संबंधित बातम्या: