पुणे | 17 नोव्हेंबर 2023 : नोकरीची वाट पाहणाऱ्या लाखो युवकांना राज्य सरकार दिलासा देणार आहे. मुलाखतीनंतर लगेच नोकरी मिळणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने योजना तयार केली आहे. नागपूरमधून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. ९ आणि १० डिसेंबर रोजी यासाठी राज्यस्तरीय मेळावा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील अनेक ठिकाणी या पद्धतीने मेळावे घेऊन खासगी कंपन्यांमध्ये सरकारमार्फत भरती करण्यात येणार आहे. यामुळे एकीकडे आरक्षणासाठी राज्यातील वातावरण तापले असताना राज्य शासनाने शासकीय प्रमाणे खासगी कंपन्यांमध्ये भरती सुरु करण्यासाठी पावले उचलली आहे.
सरकारी पदे भरण्याची प्रक्रिया
राज्य शासनकडे लाखो पदे रिक्त आहे. त्यातील ७५ हजार पदे भरती करण्यासाठी प्रक्रिया राज्य शासनाने सुरु केली आहे. एमपीएससी आणि सरळ सेवा भरतीने ही प्रक्रिया होत आहे. परंतु यासाठी मोठी प्रक्रिया आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया, लेखी परीक्षा त्यानंतर मुलाखती होतात. त्यात वर्षभरापेक्षा जास्त कालावधी जातो. परंतु आता चट इंटरव्ह्यू आणि पट नोकरी ही योजना सुरु केली आहे. महायुती सरकार या माध्यमातून खासगी कंपन्यांमध्ये नोकरी देणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकास विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे. या विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर आयोजनाची जबाबदारी दिली आहे.
नागपूरपासून होणार सुरुवात
शासनाच्या मुलाखतीनंतर नोकरी योजनेची सुरुवात नागपूरमधून होणार आहे. त्यासाठी कोणत्या कंपनीत किती पदांची भरती होणार आहे, त्यासाठी पात्रता काय आहे, याची माहिती दिली जाईल. युवकांच्या बायोडाटांची छाननी करुन मुलाखती घेतली जाईल. त्यानंतर त्याच ठिकाणी ऑफर दिली जाईल. नागपूरच्या मेळाव्यासाठी नोंदणी आठवड्याभरात सुरु होणार आहे.
मेळाव्यासाठी पाच कोटी
राज्य सरकारने या मेळाव्यासाठी पाच कोटी रुपये दिले आहे. खासगी कंपन्यांमध्ये भरती सरकारमार्फत करण्यासाठी ही योजना तयार केली आहे. सरकारीच नाही तर खासगी नोकरी सरकार देणार, अशी प्रतिमा उभारण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वत्र ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.