पुणे: भारतीय लष्कराला संरक्षण दल न म्हणता सशस्त्र सैन्य दल म्हणणे योग्य आहे. ‘संरक्षण’ हा शब्द बचावात्मक पवित्रा दर्शवतो तर ‘सशस्त्र सैन्य दल’ आत्मविश्वास जागवतो. त्यामुळे भारतीय लष्कराला संरक्षण दल न म्हणता सशस्त्र सैन्य दल म्हणा, असं आवाहन सेवानिवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी केले.
पुणे येथील श्री बालाजी (अभिमत) विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारोह राज्यपाल कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने संपन्न झाला, त्यावेळी भूषण गोखले बोलत होते. लढाऊ पायलट प्रमाणे युवकांनी उच्च ध्येय ठेवावे. मात्र ज्या समाजाने आपल्याला मोठे केले, त्या समाजासाठी कार्य करावयाचे असल्यामुळे आपले पाय जमिनीवर घट्ट ठेवावे, असा सल्लाही गोखले यांनी दिला.
पदवी प्राप्त करणे ही शिक्षणाची सीमा नसून तो शिक्षणाचा आरंभ आहे. स्नातकांनी जीवनात मोठे ध्येय निर्धारित करून त्याच्या प्राप्तीसाठी परिश्रम केल्यास विलक्षण प्रगती करता येईल. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना प्रत्येकाने आत्मनिर्भर झाले पाहिजे. तसेच आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
आपण केवळ नोकरी व रोजगार मिळविण्यासाठी पदवी घेतली का? याचा स्नातकांनी विचार करून डोळ्यांपुढे मोठे लक्ष्य ठेवले पाहिजे. जीवनात अपयश आले तरी न डगमगता अधिक परिश्रम करून यश प्राप्त केले पाहिजे. शिक्षणाला संस्कार व नीती मूल्यांची जोड दिल्यास विद्यार्थी चांगले नागरिक होतील, असे राज्यपालांनी सांगितले.
श्री बालाजी विद्यापीठाचे 22000 माजी विद्यार्थी जगभर विविध ठिकाणी चांगले कार्य करीत असून विद्यापीठाचे संस्थापक डॉ कर्नल बालसुब्रमण्यम यांनी महिला सक्षमीकरणाला विशेष महत्व दिल्याचे प्रकुलपती बी. परमानंदन यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. जी. के. शिरुडे यांनी यावेळी विद्यापीठाच्या अहवालाचे सादरीकरण केले. यावेळी 2019-21 तुकडीच्या स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या तर गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.
दीक्षांत समारोहाला श्री बालाजी विद्यापीठ पुणे येथून एअर मार्शल भूषण गोखले (सेवानिवृत्त), अध्यक्ष, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, श्री बालाजी विद्यापीठाचे प्रकुलपती बी. परमानंदन, कुलगुरु डॉ जी के शिरुडे तसेच दूरस्थ माध्यमातून कॉल हेल्थ कंपनीचे मुख्याधिकारी टी. हरी, ओनिडा इंडियाचे माजी प्रमुख यशो वर्मा, शिक्षक व स्नातक विद्यार्थी उपस्थित होते.
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 16 January 2022 pic.twitter.com/QfUyTD1Anh
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 16, 2022
संबंधित बातम्या:
मुलगी झाली हो मालिकेचं शूटिंग बंद पाडण्याचा कट? ग्रामस्थांनी सांगितलं, असं तर काहीच नाही!