पुण्यातील पब संस्कृती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी मनसेकडून एक सही संतापाची आंदोलन सुरु आहे. पुण्याच्या गुडलक चौकात मनसेकडून आंदोलन सुरू आहे. हिट अँड रन प्रकरणामुळे पब संस्कृती पुन्हा एकदा वादात सापडली आहे. त्यामुळे मनसेने याविरोधात आंदोलन केले आहे.
पुण्यातील हिट अँड रन प्रकरण चर्चेत आल्यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने एका दुचाकीला धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाले होते. मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला लगेचच जामीन मिळाला होता. पण त्यानंतर लोकांनी नाराजी व्यक्त केली. हे प्रकरण चर्चेत आल्याने दबाव वाढला. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याची दखल घेतली.
या प्रकरणात मुलगा, वडील आणि आजोबा असे तिघे ही जण सध्या तुरुंगात आहेत. मुलगा अल्पवयीन असताना देखील त्याला गाडी दिल्याने वडिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. वडील विशाल अग्रवाल हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दुसरीकडे आजोबांनी हा गुन्हा आपल्या अंगावर घ्यावा म्हणून त्यांच्या ड्राईव्हरवर जबरदस्ती केली आणि त्याला दोन दिवस डांबून ठेवल्याने सुरेंद्र अग्रवाल यांना देखील अटक झाली असून कोर्टाने त्यांना २८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कल्याणीनगर पुणे अपघाताच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहिमेत शहरातील तसेच जिल्ह्यातील 49 पब आणि बारवर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात केले आहेत. त्यातील बरेच पब आणि बार बंद करून सील करण्यात आले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी सांगितले की, कल्याणी नगर अपघाताच्या घटनेनंतर 49 पब आणि बारवर कारवाई करण्यात आलीये. घटनेच्या आधी एप्रिल आणि मे महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने 57 पब आणि बार वर कारवाई करण्यात आली होती. गेल्या वर्षभरात 257 ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. तसेच या कारवाई मध्ये 1 कोटी 12 लाख रुपयांच दंड देखील वसूल करण्यात आला आहे. विना परवाना मद्य विक्री करणाऱ्या पब आणि बार वर कारवाई करण्यात येत असून ही कारवाई अशीच पुढे चालू राहणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितल.