पुणे, दि. 30 डिसेंबर 2023 | पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या राज्यातील युवकांना नवीन वर्षांत चांगली बातमी आहे. महाराष्ट्र पोलीस दलात 2023 मध्ये 23 हजार पोलिसांच्या भरतीनंतर आता नवीन वर्षांत म्हणजेच 2024 मध्येही मेगा भरती होणार आहे. पोलीस भरतीचा नवीन आकृतीबंध तयार केला गेला. त्यानुसार राज्यातील पोलिसांच्या अनेक जागा रिक्त आहेत. या जागांवर आता नवीन वर्षांत भरती होणार आहे. 13 हजार पोलिसांची पदे भरण्यात येणार आहे. राज्यात 70 वर्षांपूर्वीच्या आकृतीबंधानुसारच सध्या पोलीस दलातील मनुष्यबळ आहे. आता नवीन आकृतीबंधामुळे आता राज्यातील हजारो युवकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
राज्यातील सध्याचे पोलिसांचे मनुष्यबळ अपूर्ण आहे. यामुळे राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याचा आढावा घेण्यात आला. लोकसंख्येनुसार किती पोलिसांचे मनुष्यबळ असावे, हे पाहून नवीन आकृतीबंध जून महिन्यात तयार करण्यात आल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. हा आकृतीबंध तयार करताना प्रत्येक शहर- जिल्ह्याची माहिती मागवली. नवीन पोलिस ठाणी किती तयार करावे लागणार? ही माहिती घेतली गेली. कारण यापूर्वी गृह विभागाने १९७६ साली आकृतीबंध तयार केला होता. त्यानंतर आकृतीबंध झाला नव्हता. यामुळे नवीन जागांची भरती होणार आहे.
गृह विभागाने 23 हजार पोलिसांची भरती यावर्षी केली. त्याचे प्रशिक्षण सुरु आहे. राज्यातील दहा केंद्रांमधील नवप्रविष्ठांचे प्रशिक्षण येत्या फेब्रुवारीमध्ये संपणार आहे. यामुळे त्यापूर्वी नवीन भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. कारण मार्च, एप्रिल महिन्यात पुन्हा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. तसेच जिल्ह्यांमधील गावांची गरज ओळखून नवीन पोलीस ठाणेही मंजूर केले जाणार आहे. यामुळे आता राज्यातील युवकांनी भरतीची तयारी सुरु करायला हवी.
मागील दोन वर्षांत कोव्हीडमुळे भरती झालेली नाही. त्यानंतर 2023 मध्ये भरती करण्यात आली. परंतु कोरोनाच्या दोन वर्षांत अनेक युवकांची वयोमर्यादा गेली. त्यामुळे नवीन भरती करताना वयोमर्यादा वाढवून देता येईल का? याचा विचार सरकारकडून करण्यात येणार आहे.