पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पिंपळगाव (खडकी) गावातील बैलगाडा मालक, घड्याळ मास्टर आणि जुपनी बहाद्दर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महादूशेठ गणपत पोखरकर माडीवाले (वय 70 वर्षे) यांची बैलगाडा मिरवणुकीने अंत्ययात्रा काढण्यात आली
महाराष्ट्रातील पहिली इनामी बैलगाडा शर्यत
पिंपळगाव (खडकी) गाव बैलगाडा क्षेत्राची पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. बैलगाडा क्षेत्रात गावाचा नाव लौकिक वाढविण्यात माडीवाले परिवाराचा मोठा सिंहाचा वाटा राहिला आहे. सन 1956 मध्ये महाराष्ट्रातील पहिली इनामी बैलगाडा शर्यत भरवण्यात या परिवाराचे योगदान होते. त्यामुळेच बैलगाडा घाटात निषाणाचे मानकरी म्हणून त्यांना बहुमान देण्यात आला.
बैलगाडा शर्यतीच्या घाटात घड्याळाचा काटा निर्णय देण्याची जबाबदारी कै. महादूशेठ पोखरकर माडीवाले यांनी समर्थपणे सांभाळली. बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात म्हणून त्यांनी प्रत्येक आंदोलनात सहभाग घेतला.
अखेरची सलामी देण्यासाठी बैलगाडा मिरवणूक
बैलगाडा शर्यती आज-उद्या सुरू होतील या आशेवर शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचा दिनक्रम सुरू असायचा. त्यांना अखेरची सलामी देण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील बैलगाडा मालक, शेतकरी बांधव आणि पिंपळगाव ग्रामस्थांनी बैलगाडा मिरवणूकीसह अंत्ययात्रा काढून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
बैलगाडा शर्यती सुरू होऊ न शकल्याने अंत्यविधी प्रसंगी अनेक बैलगाडा मालकांनी शोकसभेत तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या आणि बैलगाडा शर्यत सुरू करण्याची जोरदार मागणी केली.
बैलगाडा शर्यतींसाठी पुन्हा प्रयत्न
दरम्यान, राज्यातील बैलगाडी शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. पारंपरिक वारसा आणि शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडी शर्यतीकडे पाहिले जाते. बैलगाडी शर्यतीच्या आवडीमुळे देशी जनावरांचे गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धीने संगोपन केले जाते. या करीता बैलांचा सराव आणि शर्यत पूर्ववत सुरु करण्यासाठी महिन्याभरात मार्ग काढण्यात येणार असल्याचे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले होते.
इतर बातम्या:
बैलगाडी शर्यत आणि सराव पूर्ववत सुरु करण्यासाठी महिनाभरात मार्ग काढणार, सुनील केदार यांची माहिती
VIDEO: भास्कर जाधवांकडून पंतप्रधान मोदींची मिमिक्री, म्हणाले…