Rain Update | राज्यात आणखी किती दिवस असणार पाऊस, नागपूरची काय असणार परिस्थिती

| Updated on: Sep 24, 2023 | 8:05 AM

Maharashtra Rain Update | राज्यात पाऊस चांगलाच सक्रीय झाला आहे. विदर्भाला शुक्रवारी आणि शनिवारी पावसाने झोडपून काढले. रविवारी पुन्हा नागपूरसाठी अलर्ट दिला आहे. संपूर्ण राज्यात पावसाचा अलर्ट जारी केला आहे.

Rain Update  | राज्यात आणखी किती दिवस असणार पाऊस, नागपूरची काय असणार परिस्थिती
विदर्भात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला.
Image Credit source: tv9 Marathi
Follow us on

पुणे | 24 सप्टेंबर 2023 : राज्यात शनिवारी मुसळधार पाऊस झाला आहे. विदर्भात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली. नागपूरमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे रस्तेत पाण्यात गेले. रस्त्यावर चार ते पाच फूट पाणी साचले होते. पावसाच्या हाहा:कारामुळे नागपुरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. आता पुन्हा रविवारी राज्यभर पावसाचा अलर्ट दिला आहे. हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे मुसळधार पावसाचा शक्यता आहे.

का कोसळतोय मुसळधार पाऊस

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. सिक्कीम ते मध्य महाराष्ट्र या भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. बुधवारपर्यंत संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. आता 27 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. रविवारी पुन्हा नागपूर जिल्ह्यास पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. राज्यात रत्नागिरी वगळता सर्वत्र यलो अलर्ट दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यास पावसाचा कोणताही अलर्ट दिला नाही.

पुणे शहरात दोन दिवसांपासून संततधार

पुणे शहर आणि खडकवासला धरण परिसरात संततधार पाऊस सुरु आहे. या भागांत दोन दिवसांपासून पाऊस होत असल्यामुळे धरणांचा जलसाठा वाढला आहे. पुण्यातील पानशेत, वरसगाव तसेच मुळशी धरण शंभर टक्के भरले आहे. यामुळे या धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. खडकवासला धरणात पाणीसाठा वाढला आहे. हे धरण शंभर टक्के भरण्याचा मार्गावर आहे.

हे सुद्धा वाचा

नागपुरात 110 मिलिमीटर पाऊस

नागपुरात 110 मिलिमीटर पाऊस झाला आहे. पावसामुळे नागनदीचे पाणी अनेक वस्त्यांमध्ये शिरले. शनिवारी झालेल्या या पावसामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 14 जनावरांना मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पावसाचे पाणी सुमारे 10 हजार घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठे नुकसान आहे. पावसाचा फटका बसलेल्या लोकांना तातडीची 10 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दुकानांना 50 हजार रुपये तर छोट्या दुकानदारांना 10 हजार मदत दिली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.