पुणे | 2 ऑक्टोंबर 2023 : सप्टेंबर महिन्यात राज्यातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस झाला. त्या पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. राज्यातील अनेक भागांत पुढील दोन दिवस पाऊस असणार आहे. दुसरीकडे हवामान विभागाने मान्सून संपला असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे. यामुळे आता परतीचा पाऊस किती पडणार? यावर राज्यातील धरणांमधील जलसाठ्यातील वाढ अवलंबून आहे. राज्यातील प्रकल्पांमध्ये अजून ७९ टक्केच जलसाठा आहे.
दक्षिण कोकणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे पुढील ४८ तास राज्यात पावसाची शक्यता आहे. कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दक्षिण व मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. विदर्भात सर्वत्र यलो अलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा अलर्ट नाही. मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
पुणे आणि मुंबईत आणखी दोन दिवस पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आता ४ ऑक्टोंबरनंतर पावसाचा जोर कमी होणार आहे. पुणे घाटमाथ्यावर चांगला पाऊस सुरु आहे. पुणे परिसरातील धरणे भरली आहे. त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. तसेच शेतीला पाणी उपलब्ध होणार आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. रविवारी दुपारी दोन वाजल्यापासून ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. या ठिकाणी तीन तासांत तब्बल 89 मिलिमीटर पावसाची झाली आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील निवळे येथे 138 मिलिमिटर तर धनगरवाडा येथे 161 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. मुसळधार पावसामुळे चांदोली परिसरातील भात शेती पाण्याखाली गेली आहे. वारणा नदीला पूर आला आहे. नदीकाठची शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. चांदोली धरणातून दुपारी तीन वाजता 1500 क्युसेक विसर्ग होता तो रात्री साडेनऊ वाजता 9500 करण्यात आला आहे.