पुण्यातील युवकाने नाण्यांचा वापर करुन बनवले अनोखे शिवलिंग, किती लागली नाणी

| Updated on: Feb 18, 2023 | 2:50 PM

तब्बल २२ हजार ३०१ नाण्यांचा वापर करुन त्याने शिवलिंग साकारले. वेगवेगळ्या किंमतीची नाणी त्यासाठी वापरली. या शिवलिंगाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

पुण्यातील युवकाने नाण्यांचा वापर करुन बनवले अनोखे शिवलिंग, किती लागली नाणी
पुणे येथे नाण्यातून साकारलेले शिवलिंग
Image Credit source: social media
Follow us on

पुणे : वेगळे काही करण्याचा धास असला तर कोणतीही नवनिर्मिती केली जाते. पुणे शहरातील युवकाने अनोखे शिवलिंग (mahashivratri) बनवले आहे. हे शिवलिंग चक्क नाण्यांचा वापर करुन तयार करण्यात आले आहे. यामुळेच या अनोख्या शिवलिंगची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. या युवकाने बनवलेले शिवलिंग पाहण्यासाठी अनेक जण भेटी देत आहेत. देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत असताना या शिवलिंगची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

पुणे शहरातील येथील दीपक घोलप हा तरूण शिवभक्त आहे. तो नियमित शिवमंदिरात जातो. एकदा मंदिरात असताना त्याला नाण्यांपासून शिवलिंग बनवण्याची कल्पना आली. मग त्याने नाणी जमवणे सुरु केले. दोन, पाच आणि दहा रुपयांची नाणी त्याने मिळवली. तब्बल २२ हजार ३०१ नाण्यांचा वापर करुन त्याने शिवलिंग साकारले. वेगवेगळ्या किंमतीची नाणी त्यासाठी वापरली. या शिवलिंगाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. जगातील अशा प्रकारचे हे पहिलेच शिवलिंग असल्याचा दावा दीपक घोलप याने केला आहे.

हे सुद्धा वाचा

कोणती किती नाणी


दोन, पाच, दहा रूपयांची २२ हजार ३०१ नाणी लागली. त्यासाठी त्याने चार महिने परिश्रम घेतले. दोन रुपयांची १४ हजार ९१६, पाच रुपयांची ४ हजार ८७२ तर दहा रुपयांची ५१० रुपयांची नाणी त्याने वापरली. या नाण्यांची एकूण किंमत ७९ हजार ३०१ रुपये आहे.

जेजुरी गडावर गर्दी

महाशिवरात्र निमित्त अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरीगडाच्या मंदिरात आणि शिखरावर असणाऱ्या शिवलिंगच्या दर्शनासाठी गर्दी झाली आहे. या ठिकाणी स्वर्गलोकी,भूलोकी, पाताळलोकी (त्रैलोक्य ) असे शिवलिंग आहे. त्याच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी गर्दी केली. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या. हजारो भाविकांनी देवदर्शन घेतले . जेजुरीगडावर येळकोट येळकोट जयमल्हार,सदानंदाचा येळकोटचा ,हर हर महादेवाचा जयघोषाने वातावरण मल्हारमय झाले

जेजुरीचे काय आहे महत्व

जेजुरीला दक्षिणेकडील काशी मानले जाते. कैलास पर्वतानंतर जेजुरी गडावर शंकर व पार्वतीचे एकत्रित स्वयंभू शिवलिंग पाहण्यास मिळते. म्हणून महाशिवरात्री यात्रेला येथे वेगळे धार्मिक महत्व आहे . जेजुरी गडाच्या मुख्य मंदिरावरील शिखरात असणारे शिवलिंग हे स्वर्गलोकी शिवलिंग मानले जाते. तर गडावरील मुख्य मंदिरातील स्वयंभू लिंग हे भूलोकी शिवलिंग आणि गाभाऱ्यातील मुख्य मंदिरात असणाऱ्या गुप्त मंदिरातील तळ घरात असणारे शिवलिंग पातालोकी शिवलिंग मानले जाते. मुख्य मंदिरातील स्वयंभू शिवलिंग हे दर्शनासाठी रोज खुले असते तर मंदिराच्या शिखरावरील व मुख्य मंदिरातील तळ घरातील शिवलिंग हे केवळ वर्षातून एकदा महाशिवरात्री दिवशी दर्शनासाठी उघडले जाते. महाशिवरात्रीला जेजुरी गडावर त्रैलोक्य शिवलिंग दर्शनाची मोठी पर्वणी असल्याने हजारो भाविक हा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी करीत असतात.