शंकर देवकुळे, सांगली : मागील आठ दिवस राज्यातील राजकारण शरद पवार यांच्यांभवती केंद्रीत होते. राज्यासह देशात शरद पवार यांच्या निर्णयाची चर्चा होत होती. राज्यभरातील कार्यकर्ते शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी आंदोलन, उपोषण करत होते. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेत शरद पवार यांनी सतत भेटत होते. देशभरातील इतर पक्षातील नेत्यांचे शरद पवार यांना फोन येत होते. या परिस्थितीत सिल्व्हर ओकवरून सर्वसामान्यांची कामे आपल्या स्टाईलने शरद पवार करत होते. मणिपूरमध्ये सुरु असलेल्या दंगलीत सापडलेल्या सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शरद पवार यांनी अशीच मदत केली.
मध्यरात्री मिळाले संरक्षण
मणिपूर येथील दंगलीत सापडलेल्या सांगली जिल्ह्यातील जत येथील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एका रात्रीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सूत्र फिरविली आणि ऑपरेशन फत्ते झाले. शरद पवार यांच्या तत्परतेमुळे मध्यरात्रीच या विद्यार्थ्यांना मिल्ट्रीने संरक्षण पुरवत सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
मुलाने सांगितली परिस्थिती
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही विद्यार्थी मणिपूरमध्ये शिक्षणासाठी होते. परंतु त्या ठिकाणी सुरु असलेल्या दंगलीमुळे पालक चिंतेत होते. जत तालुक्यातील आवंडी गावातील संभाजी कोडग यांचा मुलगा मयूर दंगलीत अडकला होता. त्याने वडिलांना फोन करून मणिपूरमधील परिस्थिती सांगितली. आम्हाला येथून वाचवा, आजुबाजुला गोळीबार आणि स्फोट होत असल्याचे सांगत नाहीतर हा माझा शेवटचा फोन असेल, असे म्हटले.
वरे यांना केला संपर्क
विद्यार्थ्याच्या वडिलांनी ओळखीतून बारामतीच्या शेतकऱ्यांकडे मदतीची याचना केली होती. मळद (ता. बारामती) येथील ऑरगॅनीक ॲन्ड रेस्युड्यू फ्री फार्मर्सअसोसिएशन (मोर्फा) सचिव प्रल्हाद वरे यांना गुरुवारी सायंकाळी (४ मे ) मोर्फाचे सभासद संभाजी कोडग (रा. आवंडी) यांचा फोन केला. त्यांनी त्यांचा मुलगा ‘आयआयआयटी’ इन्फाळ येथे शिक्षणासाठी आहे. तो आणि महाराष्ट्रातील दहा तसेच इतर राज्यातील दोन असे बारा जण होस्टेलमध्ये अडकले आहे. होस्टेलजवळ शेजारी तसेच ठिकठिकाणी दंगल मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. या भयंकर परिस्थितीत काहीही करा, अशी विनवणी कोडग यांनी केली.
मग राऊत यांना केला संपर्क
वरे यांनी शुक्रवारी सकाळी शरद पवार यांच्याकडे जाऊ, असे सांगत मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. परंतु कोडग यांनी एवढा धीर नव्हता. कधीही होस्टेलवर हल्ला होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. मग वरे यांनी त्यांना पवार यांचे स्वीय सहायक सतीश राऊत यांचा मोबाईल क्रमांक दिला. कोडग यांनी तातडीने राऊत यांच्याशी संपर्क साधला. राऊत यांना सर्व प्रकार सांगितला.
पवारांचा राज्यपालांना फोन
घटनेचे गांभीर ओळखून राऊत यांनी प्रकरण शरद पवार यांनी सांगितले. त्यानंतर लागलीच शरद पवार यांनी मणिपूरच्या राज्यपालांना फोन केला. तसेच संबंधित मुलांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची विनंती केली. त्यानंतर रात्री बारा वाजता मिल्ट्रीचे चिफ कमांडर यांनी कोडग यांचा मुलगा मयूर कोडग याला संपर्क साधला. काही काळजी करू नका, सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी आम्ही लवकरच येत असल्याचे कळविले. त्यानंतर काही वेळातच सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवले. त्या रात्रीतच सर्व 12 मुलांना लष्करी छावणीमध्ये सुरक्षीत स्थलांतरीत करण्यात आले. त्या दिवशी एकीकडे शरद पवार यांनी अध्यक्षपदापासून दूर होण्याचा निर्णय जाहीर केला होता. दुसरीकडे त्यांनी सर्वसामान्य लोकांची कामे सुरूच ठेवली होती.