प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, राजगुरूनगर | 20 ऑक्टोबर 2023 : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार निशाणा साधला. आरक्षणासाठी काल आपल्या एका बांधवाने बलिदान दिलं. आता या पुढे एकही बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही. काहीही होऊ द्या. एकही बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही. आरक्षण घेतल्याशिवाय राहायचं नाही. आरक्षण घेऊनच माघार घ्यायची, अशी गर्जनाच मनोज जरांगे पाटील यांनी केली. सरकारला दिलेली मुदत संपायला अवघे चार दिवस बाकी आहेत. त्यापूर्वीच जरांगे पाटील यांनी हा इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांची आज पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरमध्ये प्रचंड सभा पार पडली. पश्चिम महाराष्ट्रातील जरांगे पाटील यांची ही पहिलीच सभा होती. पश्चिम महाराष्ट्रातील जरांगे पाटील यांची सभा यशस्वी होणार की नाही? अशी चर्चा सुरू होती. पण जरांगे पाटील यांची ही सभा प्रचंड मोठी झाली. या सभेला हजारो मराठे उपस्थित होते. उन्हातान्हातही लोक येऊन बसले होते. अत्यंत शांततेत ही सभा सुरू आहे. या सभेतूनच जरांगे पाटील यांनी सरकारला गंभीर इशारा दिला.
आपल्यावर सरकार सोडून कोणीच अन्याय करत नाही. अंतरवलीतील सभेएवढी मोठी सभा आहे. हे पुणेरी मराठे आहेत. यांच्या नादी लागू नका. काल एकाने आरक्षणासाठी मुंबईत आत्महत्या केली. आपल्यातील एक लेकरून गेलं. कावळे नावाच्या बांधवाने आत्महत्या केली. आपण त्याचं बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही. सरकारच्या भूमिकेमुळे आमचे बळी जात आहे. आमच्या आत्महत्या होण्याला सरकार जबाबदार आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.
मी हारफुलं घेतले नाही. कारण मी जिवंत मराठ्यात वावरतो. काल आपला एक बांधव आपल्यातून गेला. तेच लेकरू आपल्या घरातील असतं तर हारफुले घेतले नसेत ना. मी हारफुले घेण्यासाठी येत नाही. मी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी येत आहे. तुमचं दु:ख पाहवत नाही. त्यामुळे मी तुमच्याकडे आलो, असं त्यांनी सांगितलं.
जेवढे बलिदान झालं. काहीही झालं तर ते वाया जाऊ द्यायचं नाही. आत्महत्यांना सरकारच जबाबदार आहे. आधीच आरक्षण दिलं असतं तर आत्महत्या झाली नसती. आपण 29 ऑगस्टला आरक्षमाचा लढा सुरू केला. अजूनही सुरू आहे. एकाचं मत होतं ठोकाठोकी होऊ द्या. पण आपण शांततेच्या मार्गाने जात आहोत. आपलं युद्ध रोखण्याची ताकद कुणात नाही.
आपलं आंदोलन शांततेत आहे. शांततेच्या युद्धानेच आरक्षण द्यायचं हा शब्द आहे. आरक्षण घेतल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. मी कार्यक्रमच वाजवतो. टप्प्यात आल्यावर सोडतच नाही. जालन्यातील लोकांना माझा स्वभाव माहीत आहे. आपल्या मायमाऊल्या आपल्यासोबत आंदोलनात उभ्या आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.