पुणे | 20 ऑक्टोंबर 2023 : मराठ्यांना आरक्षण मिळाले तर जल्लोष होईल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल, असा इशारा जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथून सरकाराला मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला होता. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची तोफ पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये धडाडली. लाखो तरुणांसमोर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा तरुणांचे बलिदान वाया जाऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले. या तरुणांच्या जीवन संपवण्यास फक्त सरकारच जबाबदार आहे. कारण सरकारने मराठा आरक्षण दिले असते तर त्या तरुणांना जीवन संपवावे लागले नसते.
मी एकदा शब्द दिला की बदलत नाही. आरक्षण घेतल्याशिवाय एक इंचही मागे फिरणार नाही. सरकारकडून मराठा समाजावर अन्याय झाला आहे. आता राज्यातील मराठा एक झाला आहे. आपण आतापर्यंत मोर्चे खूप काढले. सभा घेतल्या. परंतु आरक्षण समजून घेतले नाही. घराघरातील समाजास आरक्षण समजून घेणे गरजेचे होते. ज्यांना आरक्षण समजले त्यांनीही मराठ्यांना ते शिकवले नाही. ज्यांनी ज्यांनी आरक्षण समजून घेतले, ते नक्कीच आरक्षणात गेले. आपण फक्त बोंबलोत बसलो.
टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकारने ३० दिवसांचा वेळ मागितला. आम्ही ४० दिवसांचा वेळ दिला. सरकारने मागितलेल्या पर्यायांवर हा वेळ दिला. त्यानंतर आणखी एक पर्याय दिला. सरकारचा १ जून २००४ रोजी जीआर आला आहे. त्यात मराठा आणि कुणबी एकच असल्याचा म्हटले आहे. त्या जीआरनुसार सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आम्ही केली. सरकारने नवीन जीआर काढला. त्यात असे म्हटले की, वंशवळीच्या नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. आपण हा जीआर नाकारला.
मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण आंदोलनाचा पुढील टप्पा सांगत तीन सूत्र सांगितले. उद्यापासून प्रत्येक घराघरात जा. मराठा समाजास आरक्षण समजून सांगा. एकत्र का यायचे ते सांगा… अन् तिसरे सूत्र म्हणजे एकाने आत्महत्या करायची नाही. उद्रेक करायचे नाही. जाळपोळ करायची नाही. मराठा समाजाच्या शांततेच्या आंदोलनाने त्यांना जेरीस आणले आहे. उद्रेक केल्यावर काय होते आपल्यावर गुन्हे दाखल होतात. त्यानंतर आपल्या तरुणांना नोकरी मिळत नाही. यामुळे शांततेचा मार्ग आपला आहे. सरकार २४ तारखेच्या आत मराठा समाजास आरक्षण देईल, अशी अपेक्षा मला आहे.