सातारा | 18 नोव्हेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरा सुरू केला आहे. जरांगे पाटील आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर दोघांनीही मीडियाशी संवाद साधला. मीडियाशी संवाद साधण्यापूर्वी उदयनराजे भोसले हे जरांगे पाटील यांच्या कानात काही तरी पुटपुटले. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी मीडियाशी संवाद साधताना हातही जोडले. बराचवेळ हात जोडून ते कळकळीची विनंती करत होते. राज्यकर्त्यांना त्यांची ही विनंती होती.
सर्वांनी मनातून… अंतकरणातून विचार करायला हवा. जातीजातीत तेढ निर्माण करू नका. काय बोलायचं? सर्वांनीच विचार करण्याची वेळ आली आहे. या देशाचे तुकडे करू नका. नाही तर या देशाची खऱ्या अर्थाने वाट लागेल, अशी हात जोडून उदयनराजे यांनी कळकळीची विनंती केली. बराचवेळ हातजोडून उदयनराजे कळकळीची विनंती करत होते.
मनोज जरांगे यांच्या कानात काय सांगितलं? काय कानमंत्र दिला? असा सवाल उदयनराजे यांना करण्यात आला. त्याचंही उत्तर त्यांनी दिलं. तुझंही कुटुंब आहे. त्यांना तुझी गरज आहे. त्यामुळे तू जगला पाहिजे. जग कुठं गेलं माहीत नाही. पण तू जगला पाहिजे असं मनोजला सांगितलं, अशी माहिती उदयनराजे यांनी दिली. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळात कधीच भेदभाव केला नाही. कुणालाही अंतर दिलं नाही. त्यातून धडा घेणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.
मनोज कशासाठी करतो? मराठ्यांवर अन्याय झाला म्हणून मनोज लढत आहे. मी कोणत्याही जातीचं समर्थन करत नाही. पण आज मनोज मरायला तयार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं एवढं एकच त्याचं म्हणणं आहे, असं सांगतानाच या सर्व प्रश्नांवर एकच तोडगा आहे. तो म्हणजे जनगणना करा. कुणावरही अन्याय करू नका. जे कोणी असेल त्यांना आरक्षण द्या, अशी मागणीही त्यांनी केली.
मी मराठा म्हणून बोलत नाही. पण मनोजची जी मानसिकता झाली. ती सर्वांची आहे. मेरिटवर आरक्षण दिलं पाहिजे. आज जेव्हा माझा मुलगा असो की मनोजचा की अन्य कुणाचा. तो जेव्हा कॉलेजात जातो तेव्हा त्याला आरक्षण आडवं येतं. त्यामुळे या तरुणांना दिलासा दिला पाहिजे आणि आज जातीजातीत जी तेढ निर्माण झालीय ती थांबली पाहिजे. कुणी ही तेढ निर्माण केली याचा तुम्हीच शोध घ्या, असंही ते म्हणाले.