रणजित जाधव, पुणे | 8 डिसेंबर 2023 : पुणे शहरात गेल्या आठ महिन्यांपासून एकामागे एक आगीचे सत्र सुरु आहे. शहर आणि परिसरात एक, दोन महिन्याच्या कालावधीत भीषण आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. शुक्रवारी पिंपरी चिंचवडमध्ये भीषण आग लागली. या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. या भागात वाढदिवसाच्या केकवर लावण्यात येणाऱ्या मेणबत्त्या आणि फटाक्याचे गोदाम होते. त्या गोदामाला ही आग लागली. या गोदामात सगळ्या ज्वलनशील वस्तू असल्यामुळे आग वेगाने पसरली. काही कळण्याच्या आत आगीने संपूर्ण गोदाम व्यापले. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या कामगारांना निघण्यासाठी वेळ मिळाला नाही. त्यात सात जणांचा मृत्यू झाला. अजूनही काही कामगार अडकल्याची शक्यता आहे.
पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथे फटाका गोदाम आहे. शुक्रवारी दुपारी या गोदामाला आग लागली. या गोदामाला परवाना होता का? त्या ठिकाणी ज्वलनशीर वस्तू असताना सुरक्षेची काळजी घेतली गेली होती का? सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? हे प्रश्न निर्माण झाले आहे. परंतु पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून अनेक वेळा आग लागत आहे. यासंदर्भात काहीच उपाययोजना होत नाही. या आगीत मृतांची संख्या मोठी आहे. तसेच कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान गेल्या आठ महिन्यांत झाले आहे.