योगेश बोरसे, पुणे | 4 नोव्हेंबर 2023 : राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले. त्यानंतर सरकार अॅक्सन मोडमध्ये आले. एकाच वेळी अनेक पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. शिंदे समितीची व्याप्ती वाढवण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात बाजू मांडण्यासाठी दोन निवृत्त न्यायमूर्तींची समिती तयार केली गेली. शिंदे समिती मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुरावे शोधत आहे. या समितीला राज्यभरात हजारो नोंदी मिळाल्या आहेत. आता संभाजी ब्रिगेडचे राज्यध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मोठा दावा केला आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत, यासंदर्भात ब्रिटीशकालीन पुरावे आहेत, असे त्यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ शी बोलताना स्पष्ट केले.
देशात इंग्रजांच्या काळापासून मराठा आणि कुणबी एकच असल्याच्या नोंदी आहेत. त्या काळात आरक्षण नव्हते. परंतु आता आरक्षण आहे. त्यामुळे मराठा समाजास कुणबी म्हणून आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. परंतु हे आरक्षण ओबीसमधून दिले जाऊ नये. देशात ओबीसींचे प्रमाण 52 टक्के आहे. परंतु ओबीसी समाजास केवळ 27 टक्के आरक्षण मिळत आहे. त्यामुळे त्यात मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य नाही.
ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य नाही. त्यामुळे ओबीसी समाजही नाराज होणार आहे. तसेच राज्यकर्त्यांची राजकीय अडचण निर्माण होणार आहे. सर्वच पक्षांना हा विषय अडचणीचा ठरणार आहे. मी मराठा आरक्षणाचा समर्थक आहे. मात्र आता मराठा तरुणांनी जिकडे नोकरी मिळेल तिकडे नोकरी केली पाहिजे. आरक्षणाची वाट पाहत बसू नये, असे प्रविण गायकवाड यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे उपोषण सुरु केले होते. ते प्रथम उपोषणास बसले तेव्हा शासनाला हा विषय योग्य पद्धतीने हाताळता आला नाही. त्यावेळी लाठीचार्ज करण्यात आला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनात लाठीचार्ज झाल्यामुळे त्यांना सहानुभूती मिळाली आणि मराठा तरुण अवस्थ झाला, असे प्रवीण गायकवाड यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा
दोन सख्ये भाऊ, दोघांच्या दाखल्यावर जातीच्या वेगळ्या नोंदी, शिंदे समितीच्या अहवालावर प्रश्नचिन्ह