BREAKING | गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेकली, मराठा आंदोलक आक्रमक

| Updated on: Dec 09, 2023 | 6:16 PM

पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर मराठा आंदोलकांनी चप्पल फेकली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. मराठा आंदोलकांनी यावेळी गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील केली.

BREAKING | गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेकली, मराठा आंदोलक आक्रमक
Follow us on

पुणे | 9 डिसेंबर 2023 : पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे ओबीसी एल्गार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक ओबीसी नेते या सभेला हजर होते. ही सभा आटोपल्यानंतर एक धक्कादायक प्रकार घडला. सभा संपल्यानंतर गोपीचंद पडळकर या सभास्थळाला लागून असलेल्या अण्णा काटे यांच्या उपोषणस्थळाला भेट देण्यासाठी गेले. यावेळी तिथे असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांनी गोपीचंद पडळकर यांच्या अंगावर चप्पल फेकली. मराठा आंदोलकांनी यावेळी गो बॅक अशा घोषणा देखील दिल्या.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाचं आरक्षणासाठी ठिकठिकाणी उपोषण आणि आंदोलन सुरु आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजाकडूनही सभा घेतल्या जात आहेत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये सध्या वाकयुद्ध रंगलं आहे. गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर गोपीचंद पडळकर आंदोलनस्थळी गेले तेव्हा त्यांच्यावर चप्पल फेकण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. गोपीचंद पडळकर आता तिथून निघून गेले आहेत.

गोपीचंद पडळकर आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले?

“मागासवर्ग आयोगावर असताना मी अनेक गोष्टी पाहिल्या. आम्ही दाखला काढण्यासाठी गेलो तर तीन माहिने लागतात. पण राज्यात काही दिवसात कुणबी आरक्षणाचे सर्टिफिकेट लगेच दिले जात आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने ऍफिडेवीट कोर्टात सादर केले जात नाही. आयोगाचे सचिव जाणीवपूर्वक हे ऍफिडेव्हीट सादर करत नाहीत. भोसले नामक निवृत्त न्यायाधीश यामध्ये ढवळाढवळ करत आहेत. ओबीसी आरक्षण घालवण्याचा कट सुरु आहे”, असा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला.

“ओबीसी आरक्षण म्हणजे कॅन्सरचा पेशंट अजून दवाखान्यात घ्यायचा आहे. पण तोवर सर्दी खोकलावाला म्हणतोय मला आधी दवाखान्यात घ्या आणि उपचार करा. पण सरकार नावाच्या कंपाउंडरच्या हातात आहे की कोणाला आत घ्यायचे, मात्र आपला विश्वास केवळ त्या डॉक्टरवर आहे. तो डॉक्टर म्हणजे केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आहे”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

“होळकर, आंबेडकर आणि फुले यांना जोडणार धागा म्हणजे यशवंतराव होळकर आहेत. देशातील सर्व चळवळी या होळकर, फुले, आंबेडकर यांच्या आहेत. या चळवलीला ताकद दिली ती छगन भुजबळांनी. त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करा”, असं पडळकर म्हणाले.

“आमच्या आरक्षणावर घाला घातला जात आहे. पुणे जिल्हा हा प्रस्थापितांचा बालेकिल्ला आहे. या पुण्यातून दलित समाजाच्या लोकांना आवाहन करतो की तुम्ही आता सराफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मैं है. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. मराठा समाजाच्या जमिनी कोणी घेतल्या, पैसे घेऊन नोकरी कोणी दिल्या? तुमचा सूर्याजी पिसाळ कोण आहे? हे ओळखा. सूर्याजी पिसाळ कोण आहे? आधी मराठवड्यातील कुणबी दाखले द्या, नंतर म्हणाले राज्यातील मराठा समाजाला कुणबी आरक्षण द्या अशी मागणी केली. हे कोण करायला सांगतय?”, असा सवाल करत पडळकरांनी अप्रत्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला.

“आम्हाला तीन तीन महिने दाखले मिळत नाही आणि तिकडे एक दिवसात दाखले देतायत. अंबडमधील सभेनंतर म्हणाले भुजबळ साहेबांना असे करेल तसे करेल. अरे साहेबांच्या केसाला धक्का लागू देत नाही. रामोशी समाज सोबत आहेत. गावागावात सगळ्यांनी एकत्र या आणि एकजुटीने लढा द्या. प्रस्थापितांच्या घरात पिलावळी भरपूर झाल्या म्हणून यांना ओबीसी आरक्षण पाहिजे. एक कुणबी दाखला दिला तर आमचे सरपंच, झेडपी मेंबर, पंचायत समिती जागा गेली. म्हणून आपले आरक्षण वाचवा आणि लढा द्या”, असं भाषण गोपीचंद पडळकरांनी आज केलं.