पुणे, नाशिक | 23 ऑक्टोंबर 2023 : दसरा आणि दिवाळीसाठी झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असते. या दोन्ही सणांना घराघरात झेंडूच्या फुलांची सजावट केली जाते. पुजेसाठी झेंडूची फुले वापरली जातात. यामुळे या सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी झेंडूची लागवड करतात. त्यामाध्यमातून सणासाठी शेतकऱ्यांच्या घरात चार पैसे येतात. परंतु यंदा दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी नाराज केले आहे. झेंडूचे दर चांगलेच घसरले आहेत. पुणे, मुंबई, नाशिकच्या बाजारपेठेत झालेल्या घसरणीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नाशिकमध्ये केवळ १० ते १५ रुपये असा भाव आहे.
पुणे शहरात दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी झेंडूची फुले विक्रीसाठी आली आहे. पुण्यातील मार्केटयार्ड फुल बाजारात झेंडूची फुले खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे. मध्यरात्रीपासून या बाजारात झेंडू फुलांसोबत शेवंती, गुलाब ही फुले विक्रीसाठी आली आहे. पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्यातून शेतकऱ्यांनी फुले विक्रीसाठी आणली आहे. बाजारात फुलांची आवक वाढली आहे. परंतु फुलांना चांगला दर मिळाला नाही. यामुळे शेतकरी वर्गासमोर सणाच्या पार्श्वभूमीवर संकट निर्माण झाले आहे.
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मनमाड बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेल्या झेंडूच्या फुलांना कमी दर मिळाला आहे. शेतकऱ्यांना १० ते १५ रुपये असा कवडीमोल भाव मिळाला आहे. झेंडुंच्या फुलांमुळे दसरा दिवाळी गोड होईल, ही अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यासाठी यंदा पाऊस नसताना डोक्यावर पाणी वाहून फुल शेती जगवली. मात्र फुलांना भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. फुल विक्रीतून दसरा- दिवाळी सण गोड होण्याचे बळीराजाचे स्वप्न भंगले आहे. मनमाड बाजार समितीमध्ये जवळपास दीडशे वाहनानांची आवक झाली होती.
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असते. मुंबईतील दादर मार्केटमध्ये ग्राहकांनी फुले खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. परंतु बाजारात फुलांना मागणी जास्त आहे. त्यानंतरही फुलांना भाव कमी मिळत असल्याचे विक्रेत्यांनी म्हटले आहे. झेंडूची फुले रविवारी 50 ते 60 रुपये किलोने विकली गेली होती. परंतु सोमवारी त्यात घसरण झाली आहे. आता वीस ते तीस रुपयांपासून फुलांची विक्री होत आहे. यामुळे शेतकरी आणि विक्रेत्यांचे नुकसान होत आहे.